वर्धा नदीत नाव बुडाल्याची घटना;सहा जणांचे मृतदेह सापडले

0
41

एकूण 9 सापडले, दोघांचा शोध

अमरावती–वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून अकरा जण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह सापडले होते. उर्वरितांचा शोध सुरू होता. गुरुवारी सकाळी वर्धा नदीवरच्या हातुर्णा – दुर्गवाडा पुलाजवळ वाहून गेलेल्यांपैकी 6 मृतदेह आढळले. त्यात 4 महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. आता एकूण 9 जणांचे मृतदेह सापडले आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. पियुष तुळशीदास मटरे, अश्विनी अमर खंडाळे, वृषाली अतुल खंडाळे, निशा नारायण मटरे, अतुल वाघमारे व अन्य एक असे सहा मृतदेह आढळले आहे.
घटनेच्या दिवशी नारायण मटरे, वंशिका शिवणकर व किरण खंडारे यांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले होते. बुधवारी शोध मोहिम राबविण्यात आली पण, बुडालेल्यांपैकी एकाही व्यक्तीचा शोध लागला नव्हता. गुरुवारी सकाळीच पथकाला यश मिळाले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शोध व बचाव पथकाचे कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार जिल्हा शोध व बचाव पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची पथके कालपासून शोधकार्य करीत आहे. पोलिस , तहसीलदार , ग्रामसेवक , तलाठी , मासेमार तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी मदतकार्य करीत आहेत.