रशियन सीमेकडे तिरंगा घेऊन निघालेले विद्यार्थी सुमीत अडकले; दिला अखेरचा संदेश- आम्हाला काही झाले तर दूतावास जबाबदार!

0
57

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या 10 दिवसांनंतर सुमी शहरात अडकलेले भारतीय वैद्यकीय विद्यार्थीही आता एका नव्या लढाईत उतरले आहेत. भारतीय दूतावासाच्या अपयशाला जबाबदार धरून विद्यार्थी स्वतःहून 45 किमी अंतरावर असलेल्या रशियन सीमेकडे निघाले. विद्यार्थ्यांनी जाण्यापूर्वी दोन व्हिडिओही जारी केले आणि हा त्यांचा अखेरचा संदेश असल्याचे सांगितले. वाटेत त्यांचा जीव धोक्यात आल्यास सरकार आणि दूतावास जबाबदार असेल, असेही ते म्हणाले.

दुसरीकडे, दूतावास अजूनही विद्यार्थ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करत आहे. त्याचवेळी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सतर्क आणि सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक जोखीम घेऊ नये. परराष्ट्र मंत्रालय आणि आमचा दूतावास विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात आहे.

अन्न संपले, वीज नाही, जगायचे कसे?

हे व्हिडिओ जारी करणारे विद्यार्थी सुमी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या वर्षांतील आहेत. युद्धाच्या सुरुवातीपासून त्यांनी येथील बंकरमध्ये आश्रय घेतला होता. त्यांनी ज्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू गोळा केल्या होत्या, ते संपत आल्या आहेत.

एक वेळ जेवून कसेबसे जगणाऱ्या या विद्यार्थ्यांचा संयम तेव्हा सुटला जेव्हा येथील वीज प्रकल्पावर रशियाने बॉम्बफेक करून वीज खंडित केली. यामुळे पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला, त्यानंतर बर्फ वितळवून पाण्याची व्यवस्था करावी लागली. यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

विजेअभावी त्यांचे मोबाइलही चार्ज होत नसल्यामुळे आता त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

सुमीमध्ये पाण्याची एवढी कमतरता आहे की, बर्फ वितळवून विद्यार्थ्यांना पाण्याची सोय करावी लागत आहे.
सुमीमध्ये पाण्याची एवढी कमतरता आहे की, बर्फ वितळवून विद्यार्थ्यांना पाण्याची सोय करावी लागत आहे.

‘ऑपरेशन गंगा पूर्णपणे फ्लॉप मानलं जाईल’

व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितले की, ‘आम्ही सुमी स्टेट युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत. आज युद्धाचा 10 वा दिवस आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की रशियाने युक्रेनमधील मारियुपोल आणि वोलनोवखा येथे युद्धविराम घोषित केला आहे. सुमीपासून मारियुपोल 600 किमी अंतरावर आहे.’

‘सकाळपासूनच रस्त्यावर सतत गोळीबार, बॉम्बस्फोट, युद्धाचे आवाज येत आहेत. आम्ही घाबरलो आहोत. आम्ही बराच वेळ वाट पाहिली, पण आता आणखी नाही. आम्ही आमचा जीव धोक्यात घालत आहोत. आम्ही सीमेकडे जात आहोत.’

‘आम्हाला काही झाले तर त्याची जबाबदारी भारत सरकार आणि युक्रेनमधील भारतीय दूतावासाची असेल. जर आमच्यापैकी कोणाचेही नुकसान झाले तर ऑपरेशन गंगा पूर्णपणे फ्लॉप मानली जाईल.’

व्हिडिओमध्ये आणखी एक विद्यार्थिनी म्हणते, “स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा हा अखेरचा व्हिडिओ आहे. आम्ही आमचा जीव धोक्यात घालत आहोत आणि सीमेकडे जात आहोत. तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. सरकारला विनंती आहे की आम्हाला येथून बाहेर पडण्यासाठी मदत करावी.”

सुमीमध्ये अनेक दिवस तेथील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मेट्रो स्थानकाचाही आश्रय घेतला.
सुमीमध्ये अनेक दिवस तेथील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मेट्रो स्थानकाचाही आश्रय घेतला.

विद्यार्थ्यांच्या निर्णयामुळे कुटुंबीयांत घबराट

व्हिडीओ जारी केल्यानंतर विद्यार्थ्यांचा हा गट बसमध्ये बसून रशियाच्या सीमेकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांशी संपर्क होत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्यांचा कसा तरी शोध घ्यावा, अशी मागणी पालकांनी सरकारकडे केली आहे. अधिकारी घटनास्थळी पाठवले पाहिजेत किंवा त्यासाठी रशियन अधिकाऱ्यांशी बोलले पाहिजे.

आता झेकोस्लोव्हाकिया सीमेवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांबद्दल

हरियाणातील कैथल येथे राहणारा कीव्ह मेडिकल युनिव्हर्सिटीचा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी प्रणव सिंगने सांगितले की, त्याने युक्रेनची राजधानी कीव्ह येथून सीमा ओलांडली आणि झेकोस्लोव्हाकिया गाठले. सीमेवर पोहोचण्यासाठी त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. झेकोस्लोव्हाकिया सीमा ओलांडल्यानंतर भारतीय दूतावासातील लोक भेटले.

झेकोस्लोव्हाकिया सीमेवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी एअरपोर्टवर ही सेल्फी काढली आणि आपल्या कुटुंबीयांना पाठवली.
झेकोस्लोव्हाकिया सीमेवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी एअरपोर्टवर ही सेल्फी काढली आणि आपल्या कुटुंबीयांना पाठवली.

प्रणवने सांगितले की, युक्रेनचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे. सर्वत्र जवानांचे मृतदेह पडलेले आहेत. माझ्यासमोर अनेक ठिकाणी स्फोट झाले. ज्या ट्रेनने आम्हाला सीमेपर्यंत जायचे होते त्या ट्रेनमध्ये चढणे सोपे नव्हते. लोक आम्हाला खाली ढकलत होते. बहुतेक युक्रेनियन लोकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जात होती. गाड्यांच्या ओव्हरलोडमुळे ट्रॅकलाही धोका निर्माण झाला होता. हे लक्षात घेऊन गाड्या संथ गतीने चालवल्या जात होत्या. चार तासांचा प्रवास 20 तासांत पूर्ण झाला.