133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

0
56

चीनमध्ये सोमवारी दुपारी एक मोठा विमान अपघात झाला. 133 प्रवाशांना घेऊन जाणारे चायना ईस्टर्न एअरलाईंसचे बोईंग-737 जातीचे एक विमान गुआंग्शी शहरालगतच्या डोंगर रांगांत कोसळले. विमानात 123 प्रवाशी व 9 क्रू मेम्बर्स होते. ज्या डोंगरावर हे विमान क्रॅश झाले, तेथील काही छायाचित्रे उजेडात आली आहेत. त्यात घटनास्थळावरुन आगीचे लोळ उठताना दिसून येत आहेत.

या अपघातात किती प्रवाशी ठार झाले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, घटनास्थळावरील चित्र पाहता बहुतांश जण होरपळून दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात तब्बल 30 हजार फूट खाली कोसळल्याची माहिती आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त विमान बोईंग-737 जातीचे आहे. या जातीच्या विमानांना यापूर्वीही अनेकदा भीषण अपघात झाले आहेत.

लँडिंगला 43 मिनिटे शिल्लक असताना तुटला संपर्क

‘ग्लोबल टाईम्स’च्या वृत्तानुसार, ‘फ्लाईट-5735’ ने सोमवारी दुपारी 1.15 च्या सुमारास कुनमिंग चांगशुई विमानतळावरुन गुआंगझोऊच्या दिशेने उड्डाण केले होते. ते 3 च्या सुमारास आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे अपेक्षित होते. पण, उड्डाणानंतर अवघ्या 71 मिनिटांतच ते कोसळले. लँडिंगपूर्वी 43 मिनिटे अगोदर त्याचा ATC शी असणारा संपर्क तुटला होता.

अपघातग्रगस्त विमान मागील साडेसहा वर्षांपासून कंपनीच्या ताफ्यात होते. या अपघाताविषयी चायना ईस्टर्न एअरलाईंसचे अद्याप कोणतेही निवेदन जारी केले नाही.

गतवर्षीचे जगभरातील मोठे विमान अपघात

मागील वर्षभरात जगभरात 15 मोठे विमान अपघात झाले. त्यात एकूण 134 प्रवाशांचा बळी गेला. तर अनेक जण जखमी झाले. 9 जानेवारी 2021 रोजी श्रीविजय एअरच्या एका विमानाला इंडोनेशियात भीषण अपघात झाला होता. त्यात विमानातील सर्व 61 प्रवाशांना मृत्यू झाला होता. हा गत वर्षभरातील सर्वात मोठा अपघात होता.

तत्पूर्वी, 2010 मध्ये चीनच्या हेनान एअरलाईंसच्या एम्प्रेयर ई-190 विमानाला भीषण अपघात झाला होता. त्यात विमानातील 96 पैकी 44 प्रवाठी ठार झाले होते.