Home Top News देवरीच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयात अनागोंदी

देवरीच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयात अनागोंदी

0

विदर्भ अनूदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचा आरोप

संघटनेचे पदाधिकारी व सहायक प्रकल्प अधिकारी यांच्याच देवरी येथे चर्चा

देवरी,दि.11-देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अनागोंदी माजली असून कर्मचाऱ्यांचे वेतन असो की कर्मचाऱ्यांची नियुक्ती यात मोठ्या प्रमाणावर भ्रस्टाचार होत असल्याचा आरोप नागपूर येथील विदर्भ अनूदानित आदिवासी आश्रम शाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने केला आहे.

संघटनेने नागपूर येथील अप्पर आयुक्तालयात याविषयी तक्रार दाखल करीत असल्याचे सहायक प्रकल्प अधिकारी शिरीष सोनवने यांच्या निदर्शनात आणून दिल्याचे कळविले आहे. संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या माहितीप्रमाणे, देवरी प्रकल्पातील श्रीकृष्ण अवधूत अनुदानित आश्रमशाळा कोकणा जमी येथील सहायक शिक्षक सुशील अंबादे यांचे दि. 31 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले. यामुळे श्री अंबादे यांचे जागी त्यांच्या पत्नी सुशिला यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणे क्रमप्राप्त आहे. श्रीमती सुशीला अंबादे या बीएडीएड असून त्यांना वर्ग 6 ते 8 या वर्गावर नियुक्ती नियमानुसार देता येते. असे असताना  संबंधित संस्थेला वारंवार विनंती अर्ज आणि विनवनी करून सुद्धा त्या संस्थेनी प्रकल्प कार्यालयाकडे त्यांचे प्रकरण पाठविले नाही. परिणामी, अर्जदार सुशिला यांना प्रकल्प कार्यालयाकडे पोस्टाने आपला विनंती अर्ज केला. असे असताना सुद्धा त्यांच्या अर्जावर प्रकल्प कार्यालय आणि संबंधित संस्था यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. यामागे संस्था आणि प्रकल्प कार्यालय यांच्यात संगनमत असून आर्थिक देवाणघेवाण साठी हे प्रकरण लांबिवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

याशिवाय संघटनेने पुढे असेही म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांचे वेतन सध्या ऑनलाइन पद्धतीने होत आहे. याकामासाठी देवरीच्या प्रकल्प कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, सदर महिला कर्मचारी सदर काम करण्यास इच्छुक नसल्याने त्याऐवजी देवरी प्रकल्पातीलच एक कर्मचारी प्रकल्पांतग्रत येणाऱ्या शाळांच्या कर्मचाऱ्याचे वेतन देयके तयार करण्याचे काम करतो. हा कर्मचारी प्रती कर्मचारी 300 ते 500 रुपये दर महिन्याच्या वेतनापोटी आकारणी केल्या शिवाय देयकेच तयार करीत नसल्याचा आरोप सुद्धा संघटनेने केला असून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर देवरी प्रकल्प कार्यालयात लूट सुरू असल्याचे म्हणणे आहे.

प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर एखाद्या कर्मचाऱ्याला आपले अतिरिक्त वेतनाची थकबाकी मिळवायची असेल तर प्रकल्प कार्यालयातील संबंधित कर्मचारी हे एकूण वेतनाच्या 10 टक्के रकमेची मागणी करतात. जे कर्मचारी प्रकल्प कार्यालयातील मागणी पूर्ण करतात, अशांचेच अतिरिक्त वेतन काढले जाते. जे कर्मचारी पैसे देत नाही, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अनेक कारणे पुढे करून थांबविले जात आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांत कमालीचा असंतोष उफाळून आल्याने या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने या प्रकरणात लक्ष घातले असून यासंबंधाने अप्पर आयुक्त यांचे कडे तक्रार करणार असल्याचे देवरीचे सहायक प्रकल्प अधिकारी सोनवने यांचे लक्षात आणून दिली.यामुळे श्री सोनवने यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत आज दि.11 रोजी बैठक लावली होती. यामध्ये सहायक प्रकल्प अधिकारी सोनवने यांनी जातीने लक्ष घालून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.  देवरी येथील प्रकल्प कार्यालयाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष तेजराज राजुरकर,सचिव हेमंत कोचे,सचिन मांडवगडे,सुरेश राठोड,वनिता अंबादे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Exit mobile version