नवाब मलिक यांची उस्मानाबादेतील 148 एकर जमीन तात्पुरती जप्त, मुंबईतील संपत्ती ईडीकडून जप्त

0
33

मुंबई,दि.13ः- मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा मोठा दणका दिलाय. आधी जमीन खरेदी प्रकरणात ईडीने अटक केली आणि आता नवाब मलिकांची संपत्ती तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. यात नवाब मलिकांच्या उस्मानाबादेतील 148 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. तर मुंबईतील घर, दुकाने, फ्लॅट अशा 8 संपत्ती जप्त करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची संपत्ती ईडीने जप्त केल्याने पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड आणि वांद्रे येथील ही संपत्ती जप्त केली आहे. मलिकांच्या एकूण 8 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांना आधीच अटक करण्यात आली, असून त्यांना न्याायलयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मलिकांची ही संपत्ती ईडीकडून जप्त

  • कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त
  • कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा ईडीकडून जप्त
  • उस्मानाबादमधील मलिकांची 148 एकर जमीन जप्त
  • कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स जप्त
  • वांद्रे पश्चिमेतील 2 राहती घरंही ईडीकडून जप्त

ईडीने जप्त केलेल्या मलिकांच्या संपत्तीचा आकडाही खूप मोठा आहे. हा आकडा कोट्यवधींच्या घरात गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांच्या अटकेवरून राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोप सुरू होते. ही अटक केवळ दबाव आणण्यासाठी आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत होता.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार मलिकांची जवळपास 11 कोटी 70 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मलिकांची सॉरीडोस नावाची कंपनी आहे. मलिक इन्फ्रास्ट्रकचरच्या माध्यमातून पैसे देण्यात आले होते. ईडीने चौकशी केली असता संबंधित संपत्ती आणि पैशांचा संबंध हा दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत येतोय. तिथून हे सगळे पैसे आले असून त्यातून ही संपत्ती घेतली गेल्याचा दावा आणि आरोप ईडीने केला आहे. मरियम गोवाला नावाच्या महिलेची संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.