राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
65

मुंबई:-:-राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली.यानंतर दिवसभराच्या राजकीय नाट्याचा अंत राणा दाम्पत्याच्या अटकेने झाला.

अटक केल्यानंतर दोघांची वैद्यकीय चाचणी झाली आणि अखेर दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. आज तातडीने सुनावणी करण्यासाठी सुट्टीच्या कोर्टाचा पर्याय होता. त्यासाठी १२.३० नंतर सुनावणी पार पडली. त्यात राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी सुनावणी घेतली. हे सुट्टीचे न्यायालय असून धानीवाले हे विशेष दंडाधिकारी आहेत. अॅड. रिझवान मर्चंट यांनी राणांची बाजू मांडली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं राणांच्या वकिलांनी सांगितलं. यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. येत्या २९ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. नियमित दंडाधिकाऱ्यांचं कोर्ट कार्यरत झाल्यावर जामीनावर सुनावणी होणार आहे. पाच दिवसांनी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

राणांना गुन्हा करत असल्याची पूर्वकल्पना होती

राणा दाम्पत्यावर आयपीसी १५३ ए नुसार कारवाई केली आहे. एखादी व्यक्ती समाजात द्वेष पसरणारं वक्तव्य करते, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल, आणि त्याला चिथावणी मिळेल असं कृत्य करते, त्यावेळी हे कलम लावण्यात आलं आहे. यासोबत आयपीसी ३४ आणि ३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलमांनुसार आरोपीला आपण केलेली कृती समाजाच्या शांततेविरोधात आणि कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू शकतो, याची जाणीव असतानाही कृत्य केल्यास ही कलमं दाखल होतात.

👉👉सरकारी कामात व्यत्यत

बॉम्बे पोलीस अॅक्ट सेक्शन ३५ अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांच्या कारवाईत एखादी व्यक्ती अडथळा आणत असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. राणा यांनी पोलीस चर्चेसाठी गेलेले असताना वॉरंटची मागणी केली. पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यानुसार ही कारवाई केल्याचं स्पष्ट झालंय.कालपासून या संपूर्ण प्रकरणात एकूण पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सोमय्यांनी वांद्रे पोलिसात दिलेला गुन्हा देखील आला खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. तर, राणा आणि भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.