राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम ४ मेपर्यंत वाढला

0
14

मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवार, ४ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, आमदार रवी राणा यांच्याविरोधात १७, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला आहे.
जामीन याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारने राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलिस स्थानकांत इनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामिनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असे सांगण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाच२ पठण करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना सर्मथक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले होते. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.