काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक:17 ऑक्टोबर रोजी होणार

0
28

काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होईल. गुलाम नबी आझाद यांच्या पक्षत्यागाच्या झटक्यानंतर रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम निश्चित झाला. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे चेअरमन मधुसूदन मिस्त्री यांनी अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतर सांगितले की, 24 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया असेल.

गरज पडल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. वैद्यकीय कारणास्तव विदेशात गेलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासोबत या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाल्या. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, पक्षाला वाचवण्यासाठी आता पावले उचलावी लागतील. कुणाला “कठपुतळी अध्यक्ष’ करून “बॅकसीट ड्रायव्हिंग’चा(मागून चालवणे) प्रयत्न झाल्यास काँग्रेस वाचू शकणार नाही. काँग्रेसच्या घटनेनुसार, सर्व पदांसाठी निवडणूक झाली पाहिजे.