जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार:विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच केली घोषणा

0
25

चित्रपट गृहातील मारहाण प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्याने याप्रकरणी मुंब्रो पोलिसांकडे तक्रार केली आहे. गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली आहे.

खोटे गुन्हे दाखल केले

जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आहे, तेही कलम 354चे. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही.

उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात घटना

ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात काल रात्री आव्हाडांविरोधात भाजप महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. काल मुंब्रा येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यातच ही घटना घडल्याचे भाजप महिला पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी सायंकाळी माझा विनयभंग केला, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. याच आरोपावरुन जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यातच ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही आता समोर आला आहे.

व्हिडिओत काय दिसते?

व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड आणि भाजपच्या महिला पदाधिकारी गर्दीत समोरासमोर आले तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी त्यांना बाजुला केल्याचे दिसत आहे. यावरुनच महिलेने आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही घटना घडली.

आव्हाडांनी गर्दीचा फायदा घेतला

तक्रारीत महिला पदाधिकाऱ्याने म्हटले आहे की, काल सायंकाळी 4 वाजता मुंब्रा येथे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुलाचा लोकर्पण सोहळा होता. या कार्यक्रमासाठी मीदेखील गेले होते. लोकार्पण सोहळ्यानंतर सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीच्या डाव्या बाजुस मी उभे होते. त्याच बाजुने जितेंद्र आव्हाड समोरून आले. मी पुढे थांबली असुनही गर्दीचा फायदा घेवुन माझा विनयभंग करण्याचे उद्देशाने त्यांनी दोन्ही हातांनी माझ्या दोन्ही खांदयास धरले. “काय मध्ये उभी आहे चल बाजुला हो ” असे लोंकाना समजु नये म्हणुन बोलुन मला बाजुला ढकलले.

वेगळ्या उद्देशाने स्पर्श केला

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाडांनी मला वेगळया उद्देशाने स्पर्श केल्याने माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यावेळी मी तेथुन पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 1 यांच्याकडे गेले. त्यांनी या बाबीची तक्रार देण्यासाठी सांगितल्याने मी मुंब्रा पेालिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

महिलेने दाखल केलेली तक्रार.
महिलेने दाखल केलेली तक्रार.
एफआयआरमध्ये महिलेने आव्हाडांवर केलेले आरोप.
एफआयआरमध्ये महिलेने आव्हाडांवर केलेले आरोप.

आव्हाडांनी आरोप फेटाळले

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी विनयभंगाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी म्हटले की, गर्दी असल्याने मी प्रत्येकाला बाजूला करत होतो. महिलेला स्पर्श करताना माझा कोणताही दुसरा उद्देश नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनीही म्हटले आहे की, गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडत असतात. जितेंद्र आव्हाड हे लोकप्रतिनिधी आहेत. ते असे वर्तन करु शकत नाहीत. त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा चुकीचा आहे.