Home Top News राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी:पत्रात लिहिले- संपूर्ण इंदूर स्फोटांनी हादरेल

राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी:पत्रात लिहिले- संपूर्ण इंदूर स्फोटांनी हादरेल

0

इंदूर स्थित एका दुकानात सनसनाटी पत्र आढळले आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खालसा महाविद्यालयात होणाऱ्या सभेत हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण इंदूर शहरातही स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. लिफाफ्यावर पत्र पाठवणाऱ्याच्या जागी रतलामचे भाजप आमदार चेतन कश्यप यांचे नाव लिहिण्यात आले आहे.

पोलिस या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात प्रवेश करत आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी त्यांची इंदूरमध्ये सभा होईल.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात पोहोचणार आहे. तेथून ती उज्जैन व इंदूरमार्गे राजस्थानात जाईल. त्यातच आता राहुल यांची बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्याची धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हे पत्र इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात आढळले. पोलिसांनी हे पत्र जप्त करून तपास सुरू केला आहे. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले जात आहे.

पत्रात हे आहे नमूद…

पत्रात सर्वात वर वाहेगुरु लिहिले आहे. त्याखाली लिहिले आहे… 1984 साली संपूर्ण देशात भयंकर दंगली झाल्या. शिखांची हत्या करण्यात आली. कोणत्याही पक्षाने या अत्याचाराविरोधात आवाज उंचावला नाही. (त्यानंतर येथे काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द आहेत.)

पत्रात पुढे लिहिले आहे की, नोव्हेंबरच्या शेवटी इंदूरमध्ये जागोजागी भयावह स्फोट होतील. बॉम्बस्फोटांनी संपूर्ण शहर उद्ध्वस्त होईल. राहुल गांधींच्या यात्रेत कमलनाथ यांनाही गोळ्या घातल्या जातील. राहुल गांधींनाही राजीव गांधींकडे पाठवले जाईल.

अन्य एका पानावर लिहिले आहे… नोव्हेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात इंदूर स्फोटांनी हादरेल. राजबाडाला विशेष लक्ष्य केले जाईल. पत्रात सर्वात खाली कुणीतरी ज्ञानसिंग यांचे नाव आहे. तसेच लेटरमध्ये अनेक मोबाइल क्रमांकही नमूद आहेत. पत्रासोबत एका आधार कार्डाची फोटोकॉपीही पाठवण्यात आली आहे.

इंदूरमधील याच दुकानात हे पत्र आढळले. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी व कमलनाथ यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
इंदूरमधील याच दुकानात हे पत्र आढळले. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी व कमलनाथ यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

कमलनाथ म्हणाले – हे भाजपचे कारस्थान

राहुल गांधी व त्यांच्या यात्रेला मिळालेल्या धमकीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, यात्रेची सुरक्षा राज्य सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. भारत जोडो यात्रेमुळे भाजप हादरली आहे. त्यामुळेच ते विविध कारस्थान रचत आहेत.

अरुण यादव म्हणाले – काँग्रेस घाबरणार नाही

काँग्रेस नेते अरुण यादव एका ट्विटमध्ये म्हणाले -राहुल गांधींची भारत जोडो यात्रा देशाची एकता, सद्भावना व बंधुभावाला जोडण्याचे काम करत आहे. देश तोडणाऱ्या ताकदी या पत्राद्वारे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काँग्रेस घाबरणार नाही. पोलिस प्रशासनाने या प्रकरणी कठोर कारवाई करावी.

असा आहे इंदूरमधील राहुल गांधींचा कार्यक्रम

इंदूरमध्ये 28 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा महूच्या दसरा मैदानावरून सुरू होऊन AU सिनेमा (इंदूर)ला पोहोचेल. शहर काँग्रेस अध्यक्ष विनय बाकलीवाल यांच्या माहितीनुसार, यात्रा येथून चोइथराम रुग्णालयामार्गे माणिकबागहून कलेक्टर चौकात जाईल. त्यानंतर तेथून काँग्रेस कार्यालयासमोरून राजबाडाला पोहोचेल. येथे राहुल गांधींची सभा होईल. या सभेनंतर राहुल कारने खालसा महाविद्यालयात जातील. तिथे ते रात्रीचा मुक्काम करतील.

Exit mobile version