Home Top News आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प:अर्थमंत्री फडणवीसांच्या पोतडीतून काय निघणार?

आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प:अर्थमंत्री फडणवीसांच्या पोतडीतून काय निघणार?

0

सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

बळीराजाला दिलासा देण्यासाठी काय निर्णय घेणार?

राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विरोधकांनीही यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय घोषणा किंवा निर्णय होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे 8 जिल्ह्यांत सुमारे 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागवण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज बळीराजाला दिलासा देण्यासाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

आगामी पालिका निवडणुकांवरही लक्ष

राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. यात मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या पालिकांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या अनुषंगानेही अर्थसंकल्पात काही घोषणा होणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या जिल्ह्यांत, शहरांत पालिका, नगरपालिका निवडणुका प्रस्तावित आहेत, त्याठिकाणांसाठी सरकारकडून काही प्रकल्प, योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

शेती, सेवा क्षेत्राचे विकासचक्र मंदावले

दरम्यान, कोरोनाचे संकट सरल्यानंतरही महाराष्ट्राला विकासाची अपेक्षित गती राखण्यात यश आलेले नसल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. कृषी व संलग्न क्षेत्र आणि सेवा क्षेत्रातील विकासाचा टक्का घसरला आहे. येत्या आर्थिक वर्षात या दोन्ही क्षेत्रांत अनुक्रमे 10.2 टक्के (गतवर्षी 11.4 टक्के), 6.4 टक्के (गतवर्षी 10.5 टक्के) वाढ अपेक्षित आहे. विधिमंडळात बुधवारी सादर झालेल्या अहवालातून हे निराशाजनक चित्र समोर आले. उद्योग क्षेत्रात मात्र तेजीचे वातावरण आहे. उद्योग क्षेत्राचा विकास दर मात्र 3.8 टक्क्यांवरून 6.1 टक्के वाढीची अपेक्षा आहे. वाचा सविस्तर

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात पाचवे

राज्याच्या दरडोई उत्पन्नात झालेली 12.5 टक्के वाढ ही सरकारसाठी दिलासादायक आहे. दरडोई राज्य उत्पन्न 2 लाख 42 हजार 247 रुपये इतके अपेक्षित आहे. सन 2021-22 मध्ये ते 2 लाख 15 हजार 233 रुपये इतके होते. दरडोई उत्पन्नात प्रगती होऊनही देशात महाराष्ट्राचे स्थान पाचवे आहे. आपल्या आधी कर्नाटक, तेलंगण, हरियाणा आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रम लागतो.

error: Content is protected !!
Exit mobile version