विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ कार्यक्रमातून गायक मुकेश यांना आदरांजली

0
13

मुंबई, दि. 16 : हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक मुकेश यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ या गीतांवर आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे पुत्र नितीन मुकेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गीते गायिली.

गायक मुकेश यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीत मैफलीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यासाठी कै. मुकेश यांचे गायक सुपुत्र नितीन मुकेश यांचा ‘शतायु मुकेश’ हा कार्यक्रम आज सायंकाळी विधान भवन प्रांगणातील हिरवळीवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, गायक मुकेश यांचे यंदाचे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम होत आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कार्यक्रम आयोजित केला होता. गायक मुकेश यांची गीते आजही ऐकली जातात. त्यांची गाणी अवीट गोडीची आणि अविस्मरणीय आहेत. गायक मुकेश यांनी आपल्या गीतातून वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन केले. त्यांचा गौरव करण्याची संधी विधिमंडळाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली आहे.

गायक नितीन मुकेश म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधान मंडळाच्या प्रांगणात गायनाची संधी मिळाली हा माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण आहे. मी जन्माने मुंबईकर आहे. या शहराशिवाय जगू शकत नाही. मराठीत बोलताना आपुलकी वाटते, असे सांगत त्यांनी वडील मुकेश यांच्या आठवणींना उजाळा दिला. नितीन मुकेश यांनी मेरा नाम जोकरमधील ‘जीना यहा- मरना यहा’, एक दिन बिक जायेगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘कही दूर जब दिन ढल जाये’, ‘चाँद आहें भरेगा- फूल दिल थाम लेंगे’, ‘जो तुमको हो पसंद, वही बात करेंगे’ यासह गायक मुकेश यांनी गायिलेली अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली.