Home Top News विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

0

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विधानसभेत लोकपाल विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. तसेच, विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत.

  • राहुल गांधींवर केलेल्या कारवाईविरोधात आज विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मुक आंदोलन केले. ‘लोकशाहीची हत्या’, असे पोस्टर विरोधकांच्या हातात होते. तसेच, हाताला व तोंडाला काळ्या फितीही बांधण्यात आल्या होत्या.
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह मविआचे अनेक आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
  • विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला आहे. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले होते. त्याचा निषेध करत विरोधकांनी जोडे मारणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, गुरुवारी शिवसेना व भाजपच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले. त्यानंतर आम्ही तातडीने विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार करत जोडे मारणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी निर्णय घेऊ, असे सांगितले. मात्र, अद्याप या आमदारांवर कारवाई झालेली नाही. या आमदारांवर कारवाई करण्याची विधानसभा अध्यक्षांची इच्छा दिसत नाही. विधानसभा अध्यक्षांचे वर्तन हे पक्षपाती दिसत आहे. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.

error: Content is protected !!
Exit mobile version