Home Top News धावत्या शिवशाही बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचा जीव वाचला

धावत्या शिवशाही बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचा जीव वाचला

0

नागपूर- अमरावती महामार्गावर नागपूरहून अमरावती जाणाऱ्या एसटीच्या शिवशाही बसला मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ अचानक आग लागली. बसमधील चालकाने प्रसंगावधान राखून गाडीला ब्रेक लावून सूचना केल्याने प्रवासी वेळीच खाली उतरले व अनुचित प्रकार टाळला.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/bus-fire.mp4
एसटीच्या शिवशाही बसला अचानक आग लागली

नागपूरहून मंगळवारी सकाळी निघालेली वातानुकूलित बस क्रमांक एमएच- ०६, बीडब्लू- ०७८८ ही कोंढाळीजवळच्या साई मंदिर जवळून अमरावतीच्या दिशेला जात होती. दरम्यान, इंजिनमधून धूर निघत असल्याचे बघत गाडीचा चालक अब्दुल जहीर शेख याने बस रस्त्याच्या कडेला लावून लगेच ब्रेक दाबला. त्याने आरडा- ओरड करत वाहक (कंडक्टर) उज्वल देशपांडे आणि प्रवाशांना माहिती दिले. त्यानंतर सर्व १६ प्रवासी सामान घेऊन पळत बसच्या बाहेर आले. प्रवाशी उतरल्यावर क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. बसमधील प्रवाश्यांमध्ये कोंढाळी येथील २ प्रवासी, तळेगाव ६, अमरावतीचे ८ प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर प्रवाश्यांना एसटीच्या इतर बसने पुढच्या प्रवासाला पाठवण्यात आले.

Exit mobile version