नवी दिल्लीत दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेला सुरुवात

0
2

नवी दिल्ली, दि. 10: भारताला १८ व्या जी-२० शिखर परिषदेचे मिळालेले यजमानपद, हे आम्हा सर्व देशवासियांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये सन्मानाने घेतले जात आहे, हीसुद्धा अभिमानाची बाब असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथील प्रगती मैदान परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम्’मध्ये जी-२० च्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे दिल्लीत दाखल झाले. परिषदेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सदनात उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 

राजधानी दिल्लीत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश असलेल्या देशांचे प्रमुख जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले असून, यंदा भारताने बांग्लादेश, इजिप्त, नेदरलँड, मॉरिशस, नायजेरिया, सिंगापूर, स्पेन, यूएई, ओमान या देशांच्या राष्ट्राध्यक्षांना विशेष आमंत्रित केले आहे.

दोन दिवसीय परिषदेची सुरुवात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. त्यांनी याप्रसंगी उपस्थित सर्व राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. या परिषदेत आरोग्य, व्यापार, शिक्षण, सुरक्षा आणि हवामान बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन दिवसीय चर्चासत्र असणार आहे. शनिवारी सकाळीपासून जी-20 शिखर परिषदेचे पहिले सत्र ‘एक सृष्टी’चे (One Earth) आयोजन करण्यात आले. दुस-या सत्रात, ‘एक कुटुंब’ (One Family) यावर विचारमंथन झाले.

‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजेच एक सृष्टी, एक कुटुंब, एक भविष्य (One Earth, One Family, One Future) ही 18 व्या जी-20 शिखर परिषदेची थीम आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये सन्मानाने घेतले जात आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणणे, यशस्वी चंद्रयान-3 अभियान, गेल्या नऊ वर्षांपासून देशात राबविण्यात आलेले विकास प्रकल्प, प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली देशाचे नाव उज्ज्वल झाले असल्याची  प्रतिक्रियाही मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिखर परिषदेच्या संध्याकाळी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून उपस्थित सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनातील मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, सचिव, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

सर्व राज्यांच्या विविध हस्तकला वस्तू प्रर्दशनाचे दालन

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन संघाच्या वतीने (TRIFED) पारंपरिक आदिवासी कला, कलाकृती, चित्रे, मातीची भांडी, वस्त्र, सेंद्रीय नैसर्गिक उत्पादने आदी भारत मंडपम येथील हॉल क्रमांक तीन मध्ये ‘क्राफ्ट्स बाजार’ (Tribes India) उभारण्यात आले आहे.  या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे दालनही उभारले असून, यामध्ये पैठणी साड्या, वारली चित्रे, कोल्हापुरी चप्पल, हिमरू शाली, बांबूची उत्पादने आदी वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. भारतातील विविध भागांतील हस्तकला उत्पादने ज्यात ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ आणि जीआय-टॅग केलेल्या वस्तूंवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. या निमित्ताने परदेशी प्रतिनिधींना स्थानिक पातळीवर एका छताखाली उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वर्षभरात 14 बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.  मुंबईत  आठ, पुण्यात चार, औरंगाबाद व  नागपूर मध्ये प्रत्येकी एका बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बैठकांमध्ये राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणुकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख परदेशी पाहुण्यांना करून देण्यात आली होती.