नागपूर : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस) या भारतातील सर्वात जुन्या व अत्यंत ख्यातनाम संघटनेच्या संचालकपदी किशोर रिठे यांची निवड करण्यात आली.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस) ही भारतातील निसर्ग अभ्यास करणारी १४० वर्षे जुनी अत्यंत ख्यातनाम संघटना आहे. किशोर रिठे हे मागील तीन दशकांपासून वन्यजीव क्षेत्रात कार्य करीत असून त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या तसेच उच्च व सर्वोच्य न्यायालयाच्या अनेक समित्यांवर तज्ञ म्हणून काम पहिले आहे. यापूर्वीही २००४-२००५ या कालावधीमध्ये किशोर रिठे यांनी बी.एन.एच.एस च्या कार्यकारी मंडळावर काम केले होते. मार्च २०२० मध्ये ते या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर २०२० ते २०२४ या कालावधीसाठी दुसऱ्यांदा निवडून आले होते. यानंतर जुलै २०२२ मध्ये त्यांची या संस्थेच्या मानद सचिव पदी निवड करण्यात आली.
यंदा मार्च महिन्यात संस्थेचे संचालक पद रिक्त झाल्याने मागील सहा महिन्यांपासून ते संस्थेच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. आता त्यांची संस्थेच्या संचालक पदी (सी. ई. ओ) नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर रिठे ही संगणक शास्त्र अभियांत्रिकी मध्ये एम. ई. असून त्यांनी वन्यजीव संरक्षण विषयात इगलंडच्या प्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यासोबतच ते एस. एन. डी. टी महिला विद्यापीठाच्या सिनेट पदावर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीची बातमी कळताच विदर्भातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.