पुणे- तृणमूल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी लोकसभा सभापतींकडे हक्कभंग कारवाईसाठी लेखी पत्र दिले आहे, अशी माहिती आज खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. भाजपच अशा प्रवृत्तीला खतपाणी घालते. ही बाब दुर्देवी आहे, असे मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले.
महिला खासदाराबाबतही अपमानास्पद वक्तव्य
पुण्यातील मानाचे गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या उदघाटन प्रसंगी सांगितले होते की, नवीन वास्तूत भारतीय संस्कृती, पंरपरेला धरुन राजकारण करावे. संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे. त्यानंतर देशाला एक चांगला संदेश गेला पाहिजे असा शब्द आम्ही एकमेकांना दिला होता. चांगल्याप्रकारे कामकाज चालू असताना त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजपच्या असंस्कृत खासदाराने केले आहे. ही पाहिली वेळ नसून अनेकवेळा त्यांनी अशाप्रकारे वक्तव्य केलेले आहे. महिला विधेयक पास करताना महिला खासदाराबाबतही त्यांनी अपमानास्पद वक्तव्य केले आहे.
सरकारला सदबुद्धी द्यावी
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात कांद्याला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. दुष्काळ परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकारला गणपतीने सदबुध्दी द्यावी, असे साकडे मी घातले.
अजितदादांविरोधात भूमिका नाही
दरम्यान, चांगला भाऊ मिळावा, असे प्रत्येक बहिणीचे नशिब नसते, असे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी संसदेत केले होते. त्यावर अजितदादा गटाकडूनही सुप्रिया सुळेंवर टीका करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. माझ्यावर जे संस्कार झाले त्यानुसार मोठया भावाचा सन्मान झाला पाहिजे याच मताची मी आहे. मी अजित दादांविरोधात भूमिका मांडलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने दहा वर्षे भ्रष्टाचाराचे आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात असताना पंतप्रधान यांनी अनेकदा आमच्यावर आरोप केले. त्यामुळे त्यांनी आधी केलेले पक्षावरील आरोप खरे होते की खोटे होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
भाजपने जाहीर दिलगिरी व्यक्त करावी
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्यासोबतचे काही घटक त्यांचासोबत गेल्यावर ते आता राष्ट्रवादी पक्षाला ‘नॅचरल करप्ट पार्टी’ म्हणत नाहीत. प्रेमाने एका घटकाला सोबत घेत आहे. ज्यावेळी ते विरोधात होते तेव्हा सुडाचे राजकारण होते का? जर आरोप खरे असतील तर त्यांनी चाैकशी करावी आणि जर आरोप खोटे असतील तर पंतप्रधान यांनी त्याचे स्पष्टीकरण द्यावे. भाजपने राष्ट्रवादीवर जे जे आरोप केले ते खोटे होते, याबाबत भाजपने जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपने आमच्यावर बेभान आरोप केले. ते खोटे असतानाही राजकारणाशी संबंध नसताना माझ्या तीन बहिणीवर ईडीचे रेड टाकली.
भाजपने कुटुंब उद्धवस्त केले
सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर ईडीची रेड केल्यावर त्यांचे कुटुंबीय कोणत्या परिस्थिती मधून गेली, याचा विचार भाजपने कधी केला आहे का? भाजपने याबाबत माफी मागितली पाहिजे. देश हुकुमशाहीने नाही तर संविधानानुसार चालतो. तपास यंत्रणाचा वापर बेकायदेशीररित्या भाजप करत आहे. त्याचे आत्मचिंतन त्यांनी करावे. त्यांच्याकडे वाॅशिंग मशीन आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. कुटुंब व राजकीय पक्ष उद्ध्वस्त करण्याचे पाप भाजप करत आहे. काश्मीर ते कन्याकुमारी सर्वच भाऊ बहिणीचे हित पाहत नाही, असे वक्तव्य मी संसदेत केले. अशाप्रकारची असंख्य उदाहरणे माझ्याकडे आहे.
शरद पवारांना पक्षातून काढले, ही कोणती संस्कृती
सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांनी ३० वर्षापूर्वी सामाजिक परिस्थिती पाहून महिला धोरण राज्यात अंमलात आणले. दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आल्याने महिलांना न्याय मिळाला. माझे वक्तव्य कोणाचे विरोधात नव्हते. मी राजकारणात आजपर्यंत कधी कोणा विरोधात वक्तव्य केले नाही. नोटीस, शिवीगाळ हे आमचे ध्येय नाही. मी व अजित दादा एकमेकांचे विरोधात नाही. पक्ष हा एक विचार आहे. आमचे व्यैक्तिक नाते व वैचारिक बैठक यात काही अंतर आले आहे. सत्तेचा गैरवापर करुन मराठी माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. निवडणुक आयोगाला लेखी पत्र आम्ही नाहीतर आमच्यातील काही घटकांनी दिले आहे. देशात पक्षाची ओळख ही शरद पवारांमुळे असून त्यांनी स्वत: पक्ष काढला. ८३ व्या वर्षी त्यांना पक्षातून काढण्याचे पाप काहीजण करतात ही कोणती संस्कृती आहे. दिल्लीतील अदृश्य शक्तीचा हात काही घटकाचे मागे असून ते तपास यंत्रणेचा गैरवापर करुन मराठी पक्ष संपविण्याचे काम करत आहे.