Home Top News मोदी केंद्रित निवडणुका लोकशाहीला घातक

मोदी केंद्रित निवडणुका लोकशाहीला घातक

0

कोल्हापुर- लोकशाहीत निवडणूक ही एक प्रक्रिया आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका या आता ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया हा करमणुकीचा कार्यक्रम होत असून राजकारण प्रणालीत पक्ष केंद्रित निवडणुकांऐवजी मोदी केंद्रित निवडणुका या लोकशाहीला घातक ठरत आहेत, अशी भीती मार्क्सवादी विचारवंत अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केली.
श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेत भारतीय लोकशाहीचे भवितव्य अंतर्गत ‘निवडणूक पद्धतीतील सुधारणा’ या विषयावर अभ्यंकर बोलत होते. शाहू स्मारक भवनमधील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विजय चोरमारे होते.
कॉ. अजित अभ्यंकर म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की, साजेसे, बरे वाटेल असे नियोजन केले जाते. लग्नाप्रमाणे वेश केला जातो. इव्हेंट मॅनेजमेंटसाठी लागेल तो खर्च केला जातो. धूर व धूळ उडवून देत एकदा मते घेतली की, विषय संपतो. या इव्हेंटमध्ये निवडणूक प्रक्रिया हरवलेली आहे. चुरस, स्पर्धा असणे म्हणजे राजकीय प्रक्रिया नव्हे. राजकारण हरवले असून फक्त स्पर्धा उरली आहे. राज्यशास्त्र विषयात राजकीय प्रक्रिया कशाला म्हणतात हे सांगताना ते म्हणाले, ज्या सामाजिक प्रक्रियेतून विचार येतो, तसेच सामूहिक हितसंबंधाला राजकीय प्रक्रिया म्हणतात. राजकीय प्रक्रिया ही समाजातून घडली पाहिजे. आज पक्षविरहित निवडणुका होत असून त्या व्यक्तिकेंद्रित झाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भ्रष्ट असलेल्या डझन लोकांना तिकिटे दिली, असा आरोपही त्यांनी केला. इकडून तिकडे सहज उडय़ा मारून वऱ्हाडाच्या बसमध्ये बसल्यासारख्या निवडणुका झाल्या आहेत. एकजण दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसून सरंजमशाही पद्धतीचे राजकारण सुरू आहे. शिवसेना आज सत्तेत जाऊन बसली, त्या प्रक्रियेला अर्थ राहिला नाही. केंद्रात भाजपचे सरकार नसून ते मोदींचे सरकार आहे. परराष्ट्रमंत्री असूनही मोदींमुळे ते दिसत नाहीत.
विजय चोरमारे यांनी निवडणुकीकडे उत्सव म्हणून पाहिल्याने घोटाळे होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक रोहित पाटील यांनी केले. संजय कांबळे, सुनील जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास कॉ. गोिवद पानसरे, शिवाजीराव परुळेकर, प्रा. विलास रणसुभे, चिंतामणी मगदूम, एस. बी. पाटील, मेघा पानसरे, दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version