मरणानंतरही वनवास संपेना; पुलाअभावी नदीतून खाटेवर नेला मृतदेह

0
8

गडचिरोली(विष्णु वैरागडे) : जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा दुर्गम भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने तेथील नागरिकांना वनवास भोगावा लागत आहे. असाच एक विदारक प्रसंग पुढे आला असून नदीवर पूल नसल्याने मृतदेह खाटेवर टाकून न्यावा लागला. या संदर्भातील चित्रफीत सार्वत्रिक झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नुकतेच ४ ऑक्टोबर रोजी गुंडेनूर येथील कटिया कारिया पुंगाटी (५०) या इसमाची प्रकृती बिघडल्याने गावातील नागरिकांनी त्याला सकाळी १० वाजताच्या सुमारास उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, लाहेरी येथे दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ लाहेरीवरून ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना रात्रीच्या सुमारास कटिया पुंगाटी याचा मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारास मृतदेह गावाकडे घेऊन जाणे शक्य नसल्याने ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गावकरी गावातील ट्रॅक्टरच्या साहाय्याने मृतदेह घेऊन गुंडेनूर नाल्यापर्यंत पोहोचले. पावसाळ्याचे दिवस असल्याने नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे गावकऱ्यांनी कटिया पुंगाटीचा मृतदेह चक्क खाटेवर घेऊन गुंडेनूर गाठले. काही दिवसांपूर्वीदेखील रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेवर बांधून दुचाकीने न्यावा लागला होता.

अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून भामरागड तालुक्याची ओळख आहे. लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र राज्याच्या शेवटचा टोकावर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते. लाहेरी परिसरातीलच नव्हेतर छत्तीसगड राज्यातील रुग्णसुद्धा याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. मात्र, लाहेरीवरून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्याने गुंडेनूर परिसरातील आदिवासींना पावसाळ्यात या नाल्यातून जीवघेणा जलप्रवास करावा लागतो. गुंडेनूर नदीपलीकडे कुवाकोडी, दामनमर्का, फोदेवाडा, बिनागुंडा, पुंगासूर, पेरमलभट्टी, गुंडेनूर आदी गावांचा समावेश आहे. पावसाळ्यात यासह आदी गावांतील नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे.