‘सागर कवच’ अभियानाचे यशस्वी आयोजन
सागरी सुरक्षेकरीता पथकाची नियुक्ती
दरमहा संयुक्त गस्तीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि. 4 – सिंधुदुर्ग जिल्हा हा समुद्र किनारपट्टीवर वसलेला असून दक्षिण-उत्तर रेखांशमध्ये पसरलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पूर्व सीमा सह्याद्रीच्या पर्वतांनी व्यापलेली आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5207 चौ.कि.मी. असून सुमारे 120 किमी लांबीचा उत्तर-दक्षिण असा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र किनाऱ्याची हद्द देवगड तालुक्यातील विजयदुर्ग पासून वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पर्यंत आहे.
सागरी किनाऱ्यासह या ठिकाणांवर निगराणी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण समुद्री मार्गाद्वारे या ठिकाणांचा वापर बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याकरीता सागरी सुरक्षा शाखेचे अनन्य साधारण महत्व आहे. याकरीता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना समुद्र किनार पट्टी, तसेच लॅन्डींग पॉईन्ट, जेटी, बंदरे, दिपस्तंभ, खाड्या, बेटे याठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्थेबाबत उपाययोजना करण्याकरीता आदेश दिले.सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे नेतृत्वाखाली सर्व सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सन-2023 मध्ये सागरी सुरक्षा उत्कृष्टरित्या सांभाळली.
जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेकरीता 7 पोलीस स्पीड बोटी, तसेच 3 पोलीस गस्ती ट्रॉलर्सद्वारे सशस्त्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नेमणुक करून सागरी गस्त नियमित करण्यात येते. गस्ती दरम्याने सागरी भागातील बोटींची व त्यावरील इसमांची तपासणी करण्यात येते. तसेच जेटी, बंदरे, बिचेस, मनुष्य व निर्मनुष्य बेटे यांना भेटी देऊन निगराणी ठेवली जाते. सन 2023 मध्ये एकूण 17,486 नॉटीकल मैल पेट्रोलींग करण्यात आलेले असून 1615 बोटी चेक करण्यात आलेल्या आहेत, तसेच त्या बोटीवरील 14,589 इसमांना चेक करुन चौकशी करण्यात आलेली आहे.सागरी किनारी भागामध्ये 10 सागरी चेकपोस्ट असून तेथुन येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसुण तपासणी करण्यात येते. सन 2023 मध्ये सागरी चेकपोस्ट वरुन ये-जा करणाऱ्या 15,307 वाहनांची तपासणी करुन त्यामधील 51,225 इसमांनाही तपासले आहे. तसेच वेळोवेळी सरप्राईझ नाकाबंदी लावून देखील वाहनांची तपासणी करण्यात येत असते. त्यामध्ये एकुण 8,287 वाहने तपासण्यात आलेली असून 17,778 इसम तपासले आहेत.किनारी भागातील मच्छिमार, सागर रक्षक दल सदस्य, पोलीस पाटील, स्थानिक नागरीक यांच्या बैठका, मेळावे आयोजित करून त्यांना सागरी सुरक्षेचे महत्व समजावून सांगुन एकमेकांकडील महत्वाच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यात येते. तसेच महत्वाची माहितीबाबत बल्क SMS व्दारे माहिती नागरीकांना देण्यात येते. सन-2023 मध्ये 301- सागर रक्षक दल सदस्य बैठका, 144 किनाऱ्यालगत भागातील बैठका आणि 62- मेळावे संवाद/ मोहिमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सागरी सुरक्षे संबंधीत असणारे इतर विभागांसोबत दरमहा बैठकीचे आयोजन करुन सागरी सुरक्षेबाबत आढावा घेवून उपाययोजना राबविण्यात येतात. त्याचबरोबर जिल्हा स्तरीय सागरी सुरक्षा समन्वय समितीच्या बैठकांचे आयोजनही करण्यात येते. सागरी सुरक्षेकरीता वन विभाग, कस्टम विभाग, मत्स्य व्यवसाय विकास विभाग, बंदर विभाग यांच्या सोबत पोलीसांच्या दरमहा संयुक्त गस्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच वरील सर्व विभागांशी समन्वय ठेवून सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याकरीता उपायायोजना करण्यात आलेल्या आहेत.
सन 2023 मध्ये 2 वेळा ‘सागर कवच अभियान’ राबविण्यात आलेले असून, एकदा ‘विशेष अभियान ऑपरेशन विजय’ राबविण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे दरमहा’सागर सजग अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येतात. विशेष अभियान काळात किनारी भागातील लोकांशी संपर्क साधुन सागर सुरक्षेबाबत सतर्कता निर्माण करण्याचा मुख्य उद्देश असून व आपल्या सुरक्षा यंत्रणेच्या तत्परतेचीही तपासणी करणेत येते.सन-2023 मध्ये भारतीय नौदलाचा “नौदल सप्ताह” यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली, ता. मालवण येथे 4 डिसेंबर रोजी तारकर्ली MTDC येथे सागरी किनारी साजरा करण्यात आला. “नौदल सप्ताह” यशस्वीपणे पार पडण्याकरीता जिल्ह्याच्या सागरी भागामध्ये ऑगस्ट पासून सतर्क सागरी पेट्रोलिंग, समुद्रीय भागात टेहाळणी करण्याबाबत उपाययोजना राबविण्यात आल्या.
मच्छीमार बांधव / सागर रक्षक दल सदस्य / मच्छिमारी सोसायटी सदस्य / पोलीस पाटील / स्थानिक नागरीक यांच्या बैठका घेणे, बल्क SMS व्दारे नागरीकांना सतर्क करणे, माहिती गोळा करणे, संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तात्काळ योग्य ती कार्यवाही करणे, समुद्री भागात पोलीस स्पीड बोटी, पोलीस गस्ती टॉलर्स, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्याकडील रेस्क्यु बोटी, जेट स्की बोटी यांची परिणामकारक पेट्रोलींग व टेहाळणी याबाबत सर्वतोपरी उपाययोजना राबविण्यात आल्यात. एंकदरीत सागरी सुरक्षेबाबत सुयोग्यपणे नियोजन केल्याने भारतीय नौदलाचा “नौदल सप्ताह” कार्यक्रम पंतप्रधान, संरक्षण मंत्री व अति महनिय व्यक्तींचे उपस्थितीत सुरळीत व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचेवेळी सिंधुदुर्ग पोलीस विभागाकडून सागरी भागामध्ये अभेद्य सुरक्षा व्यवस्था निर्माण करून कार्यक्रमाकरीता उपस्थित असलेले नागरीकांचे व वाहतूकीचे सुयोग्य नियोजन करुन जिविताची व मालमत्तेची कोणतीही हानी होणार नाही, याकरीता सर्व आवश्यक उपययोजनाही राबविलेल्या आहेत.एकंदरीत सन-2023 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रातील तसेच समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा सुरळीत ठेवण्याकरीता सिंधुदुर्ग पोलीस दलाने मोलाची भुमिका बजावलेली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे सागरी सुरक्षा शाखेकडून समुद्री सुरक्षेबाबत उपाययोजना राबविण्यात येणार असून सागरी सुरक्षा बळकट करण्यात येणार आहे.