मराठी चित्रपटात प्रथमच ऑडिओबुक्सचा `असा`ही वापर!

0
10

ओमी वैद्यच्या `आईच्या गावात मराठीत बोल` मध्ये `स्टोरीटेल`चीही `भूमिका`

जगातील प्रगत देशांमध्ये ऑडिओबुक्स ही संकल्पना लोकप्रिय ठरली. तशी ती आता आपल्याकडेही चांगलीच रुजते आहे. त्याचीच साक्ष देणारी घडमोड आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आली आहे. ती म्हणजे, प्रसिद्ध अभिनेता ओमी वैद्य घेऊन येत असलेल्या आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटामध्ये `स्टोरीटेल`लाही `भूमिका` मिळाली आहे. या चित्रपटाचा नायक मराठी गोष्ट ऐकण्यासाठी `स्टोरीटेल` वापरतो, असे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातून ऑडिओबुक्स दर्शनाचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरावा.

याबाबत बोलताना, ओमी वैद्यने सांगितले, की मी या चित्रपटाचा नायक म्हणून भूमिका साकारत असताना `स्टोरीटेल`वर ` जस्ट फ्रेंडस्` ही गोष्ट ऐकताना दाखविण्यात आले आहे. मला ही कल्पना खूप आवडली. कारण, यातील नायक समर हा अमेरिकेतून आलेला आहे आणि त्याची मराठी खूप कच्ची आहे. ती सुधारण्यासाठी तो मराठीत गोष्टी ऐकतो, असा त्यातून संदेश देण्यात आला आहे. वास्तविक, मी स्वतः पुस्तके वाचणारा तसेच ऐकणारा आहे. मला पु. ल. देशपांडे यांचे साहित्य खूप आवडते. `स्टोरीटेल` वर पुलंच्या लेखनाचा आस्वाद घेता येतो, ही अतिशय आनंदाची बाब आहे.

`आईच्या गावात मराठीत बोल` च्या लेखिका अमृता हर्डीकर यांच्या कल्पनेतून `स्टोरीटेल` या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे आले आहे. त्याविषयी बोलताना, त्या म्हणतात, की मी स्वतः जुन्या पठडीतील वाचक आहे. पुस्तक हातात घेऊन वाचायची मला आवड आहे. मात्र, अमेरिकेत गेल्यानंतर, विशेषतः कोरोनाच्या काळात मी `स्टोरीटेल`च्या माध्यमातून ऑडिओबुक्सकडे वळले आणि त्यामुळे प्रभावितही झाले. कुठलीही दृश्य न दाखवता फक्त आवाजातून, पार्श्वसंगीतातून वेगवेगळी पात्रं, प्रसंग इतक्या प्रभावीपणे श्रोत्याच्या डोळ्यापुढे उभी करणं ही अत्यंत कठीण बाब आहे. `स्टोरीटेल` वरील बहुतांश ऑडिओबुक्समधून श्रोत्यांना ते अनुभवता येते, हे मला आवडले. म्हणूनच, चित्रपटासाठी लेखन करताना मला असं वाटलं, की अमेरिकेतून येणारा चित्रपटाचा नायक समर, जेव्हा मराठी शिकायला लागेल, तेव्हा हातात पुस्तक घेऊन वाचण्यासाठी गोष्टी, कथा, कविता ऐकून मराठी शिकणे त्याला अधिक सोयीचे ठरेल. म्हणून चित्रपटात नायिका अवंती, त्याला `स्टोरीटेल`ची ओळख करुन देते. चित्रपटात समर हा स्टोरीटेलवर जस्ट फ्रेंडस् हे पुस्तक ऐकताना दिसतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांना माझे हे मत पटेल, की भारताबाहेर राहून आपली मूळ ओळख, आपली संस्कृती, आपली अस्मिता ही आपल्या मातृभाषेतूनच जोपासली जाऊ शकते. हे जेव्हा कोणाला समजते, तेव्हा त्याला जगभरात फिरुन आपला ठसा उमटवायला पाठबळ मिळतं. म्हणूनच, मला `स्टोरीटेल` हे त्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे, असे वाटते.