■ नक्षलग्रस्त भागात कंत्राटदाराने साधला डाव.
देवरी, दि.४ -सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भरेंगाव ते कळूसावटोला मार्गासाठी ४ कोटी ६० लाखांच्या निधीचे १० कि.मी. रस्ता बांधकामासाठी मंजूर झाला. मात्र नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागाचा लाभ घेत या कामात नाममात्र डांबर टाकून ठिगळ लावण्याचे काम सुरू केल्याने भर्रेगाव व नकटी ग्रा.पं. हद्दीतील गावकऱ्यांनी विरोध करीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या ग्रामीण भागाचा तालुका मुख्यालयाशी संपर्क वाढावा, या उद्देशाने राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खचून विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते बांधले जातात. मात्र प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे – बहुतांश योजनांचे केवळ सरकारी योजनांच्या निधीत रुपांतर होते. भरेंगाव ते – कळूसावटोला रस्त्याचे बांधकाम हे लुटमारीचे जिवंत उदाहरण आहे.
१० कि.मी. अंतराच्या डांबरीकरणासाठी ४ कोटी ६० लक्ष रूपये मंजूर झाले. मात्र कंत्राटदाराने कमिशनबाजीमुळे अत्यंत निकृष्ट बांधकाम केले. त्यामुळे दोन महिन्यांतच या मार्गावर खड्डे पडले. डांबराचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने गिट्टी बाहेर निघत आहे. नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागाचा फायदा घेऊन कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींना हाताशी धरून निकृष्ट बांधकाम करून शासनाचा निधी आपल्या घशात घालून भ्रष्टाचार केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला असून
तातडीने रस्ता बांधकामाची चौकशी करून पुन्हा बांधकाम करण्याची मागणीही करण्यात आली. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरीचे उपविभागीय अधिकारी विवेक महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रस्त्याच्या दर्जाबाबत अनभिज्ञता व्यक्त करून स्वतः जाऊन चौकशी करणार असल्याचे सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, याबांधकामादरम्यान एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
प्रतिक्रिया:-
————
…अन्यथा आंदोलन उभारू
—————————–
■आधीच्याच रस्त्यावर खडी टाकून नाममात्र डांबर टाकले जात. आहे. डांबराऐवजी जळालेल्या तेलाचा वापर करण्यात येत आहे. याप्रकरणाची चौकशी करून कारवाई न झाल्यास आंदोलन उभारू.
◆ ईश्वर मेश्राम, उपसरपंच, नकटी ग्रा.पं.