सांगलीत कारचा भीषण अपघात;कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ६ जण ठार

0
8

सांगली:- सांगलीत कारचा भीषण अपघात घडला आहे. मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटोपून घरी परतत असणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सांगलीतील तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ६ जण ठार झाले आहेत. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व नातेवाईक मुलीच्या वाढदिवसासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील एका गावात गेले होते. सोहळा आटपल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. तासगावच्या दिशेने येत असताना चिंचणी हाती येथे ताकारी कॅनलमध्ये अल्टो कार अचानक कोसळली. चिंचणी तासगाव-मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. कार ही थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली.

या कालव्यात पाणी नसल्यामुळे कालवा हा कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली कार ही कालव्यात आदळली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रात्र असल्याने तसेच हा परिसर निर्मनुष्य असल्याने अपघात झाल्यावर तातडीची मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला कालव्यात पडलेली गाडी दिसल्यावर हा अपघात झाल्याचे कळले. यानंतर त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. दरम्यान, पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी महिलेला दवाखान्यात भरती केले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

रात्रीची वेळ असल्याने वेळेवर मदत मिळाली नाही जखमी अवस्थेत पहाटेपर्यंत पडून राहिले

या दुर्घटनेबद्दल मनाला वेदना देणारी आणखी माहिती समोर आली आहे. कार वेगात असल्यामुळे जोरात कोरड्या कॅनॉलमध्ये आदळली. यामध्ये कारचे बोनेट आणि पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. त्यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना जबर मार लागला. हा अपघात झाला तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. परिणामी या कुटुंबाला वेळेत मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वर्दी देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले.

दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे:-

1)राजेंद्र जगन्नाथ पाटील – वय 60, 2)सुजाता राजेंद्र पाटील -वय ५५,3)प्रियांका अवधूत खराडे वय 30 वर्ष (बुधगाव),4)ध्रुवा- वय 3,5)कार्तिकी- वय 1,6)राजवी- वय 2 वर्ष

जखमी

*स्वप्नाली विकास भोसले वय 30 वर्ष