एक खासदार असलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे अशक्य असल्याने मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबला

0
39

दिल्ली: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP) नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात होते. अखेर देवेंद्र फडणवीसांनी कारण सांगितले आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आलं होते.मात्र राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम होते. मात्र प्रफुल पटेल आधी कॅबिनेट मंत्री असल्यानं अडचण येत होती. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या वतीने राष्ट्रवादीला एक जागा ऑफर करण्यात आली होती. परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडून प्रफुल पटेल यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. ते अगोदर मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येणार नाही. पण मला विश्वास आहे की, ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी त्यांचा विचार होईल.

एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे अशक्य असल्याने मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबला अशी माहिती समोर येत आहे. एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्रातून सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.मात्र दुपारी 2 पर्यंत देखील राष्ट्रवदी काँग्रेस अजित पवार गटाला कोणताही फोन आलेला नाही. राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इच्छुक उमेदवार होते. मात्र प्रफुल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते.मात्र तटकरेनी लोकसभेतून निवडून आलेल्यांना प्राधान्य असावे अशी भूमिका घेतल्याचीही चर्चा आहे.

महायुतीसमोर मोठा प्रश्न

राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इच्छुक उमेदवार होते. दोन्ही वरिष्ठ इच्छुक असल्याने राज्यमंत्रीपद देण्यासही महायुतीसमोर अडचणी होत्या. एकीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार असूनही त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळत असल्याने दुसरीकडे केवळ 1 खासदार असलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट कसं द्यायचं असा प्रश्न समोर आला आहे.

एक खासदार निवडून आलेल्या पक्षांची संख्या सात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही इच्छुक नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रीपद देण्यात देखील महायुतीला अडचणी येत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळात सहभाग अद्याप झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाल्यास घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता कारण देशात 1 सदस्य निवडून आलेले 7 पक्ष आहेत.

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे.. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात मोठ्या थाटात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी आधी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचीही यादी तयार करण्यात आले आहे. यंदा मंत्रिमंडळात अनेक नवनिर्वाचित खासदारांना संधी देण्यात आल्याचं दिसंत आहे. नरेंद्र मोदींचे नव्या मंत्रिमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्रातून जे मंत्री शपथ घेणार आहेत,त्यांच्यमध्ये ओबीसी, मराठा, एससी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. तसंच, प्रादेशित समतोलही साधण्यात आला आहे. मुंबईतून पियुष गोयल, उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे, तर विदर्भातून दोन खासदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. मराठवाडा आणि कोकणातून मात्र कुणाच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली नाही.