Home Top News घोटाळ्याची सनसनाटी अंगाशी?

घोटाळ्याची सनसनाटी अंगाशी?

0

मुंबई -काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील कंत्राटे कायम ठेवण्यासाठी ठेकेदारांनी आपल्याला १०० कोटी रुपये लाच देऊ केली होती, असा गौप्यस्फोट करून ‘हिरो’ झालेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. याप्रकरणी तक्रार केली आहे काय?, असा सवालच काँग्रेसने महाजनांना विचारला आहे.

‘मी खाणार नाही आणि कुणाला खाऊ देणार नाही’ असे ‘सुशासन’ देण्याचा वादा देवेंद्र फडणवीस यांचे सगळेच मंत्री करत आहेत. त्यात महाजन यांनी एक पाऊल पुढे टाकत आपण १०० कोटींची ऑफर धुडकावून लावल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. जामनेरमध्ये झालेल्या सत्काराला उत्तर देताना महाजनांनी जलसंपदा खाते कसे भ्रष्टाचाराने पोखरले आहे. कशाप्रकारे ठेकेदारांनी या खात्यावर कब्जा केला आहे. आधीचे सरकार कसे या ठेकेदारांचे मिंधे होते, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारच्या काळात ७० कोटींच्या कामांचे टेंडर ३७२ कोटींपर्यंत करण्यात आले. त्यामुळेच भाजपाचे सरकार आल्यानंतर या विभागाची ११०० कोटींची कामे थांबवण्यात आली. ही कामे पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला दहा टक्के प्रमाणे १०० कोटींचे कमिशन देण्याची ठेकेदारांची तयारी होती. आपण ती नाकारली असे वक्तव्य करून महाजनांनी सत्काराला जमलेल्या लोकांच्या टाळ्या मिळवल्या. मात्र, आता त्यांना या गौप्यस्फोटानंतर उभ्या राहिलेल्या प्रश्नांनाही सामोरे जावे लागणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे उघड आव्हान

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी महाजनांना ट्विटरच्या माध्यमातून उघड आव्हान दिले आहे. महाजन यांना १०० कोटींची ऑफर देणारे ठेकेदार कोण आहेत?, या ठेकेदारांवर कधी कारवाई करणार?, या ठेकेदारांची तक्रार आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे काय?, असे तीन सवाल सावंत यांनी महाजन यांना विचारले आहेत. याबरोबरच राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनीही महाजन यांच्या उद्देशाबाबत शंका घेतली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version