Home Top News भारतविरोधी 32 वेबसाईट्सवर सरकारकडून बंदी

भारतविरोधी 32 वेबसाईट्सवर सरकारकडून बंदी

0

नवी दिल्ली – भारतविरोधी मजकूर पसरवत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून 32 वेबसाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (इसिस) यासारख्या दहशतवादी संघटनांकडून भारताविरोधात या वेबसाईट्सवरून प्रचार होत असल्यामुळे सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने आम्ही या वेबसाईट्स बंद करत असल्याचे, सरकारने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेल्या डेलिमोशन, व्हिमिओ यासारख्या वेबसाईट्स आज नेटिझन्स सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना वेबसाईट्स सुरूच होत नव्हत्या. भारतात इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्यांना या वेबसाईट्स बंद घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या 32 वेबसाईट्समध्ये अनेक लोकप्रिय वेबसाईट्स आहेत. त्यामुळे भारतातील ग्राहकांकडून या कंपन्यांना ईमेल करण्यात आले आहेत. या सर्व साईट्स आयटी अॅक्ट 2000 (69) नुसार बॅन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेचे ट्विटरचे पेज चालविणाऱ्याला नुकतीच बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर उत्तर कर्नाटकमधूनही दहशतवादी भटकळशी संबंध असल्याच्या संशयावरून तिघांना अटक करण्यात आली होती. या सर्वांवर वेबसाईट्सच्या माध्यमातून दहशतीचे संदेश पोहचवित असल्याचा आरोप आहे.

Exit mobile version