Home Top News नोएडामध्ये दोन संशयीत दहशतवाद्यांना अटक, पश्चिम बंगाल पोलिसांची कारवाई.

नोएडामध्ये दोन संशयीत दहशतवाद्यांना अटक, पश्चिम बंगाल पोलिसांची कारवाई.

0

नोएडा : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी धुमाकूळ घालण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना नोएडामधून अटक करण्यात आलीय. या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश एटीएस, पश्चिम बंगाल एटीएस आणि आयबीनं मिळून पकडलंय.

उल्लेखनीय म्हणजे, आयबीनं देशातील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याची चेतावणी अगोदरपासूनच दिली होती. या शहरांमध्ये दिल्लीचाही समावेश होता. दिल्लीच्या नजिकच्या भागांत दहशतवादी लपलेले असून मोठ्या शहरांना ते आपल्या निशाण्यावर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा अलर्ट आयबीनं आधीच दिला होता. देशाच्या राजधानीनजिकच्या नोएडा भागातून या संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानं नागरिक धास्तावले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक जण बांग्लादेशाचा रहिवासी आहे तर दुसरा दहशतावादी त्याला लॅपटॉप देण्यासाठी नोएडामध्ये आला होता. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये गुप्तहेर संघटनांची रेकी करण्यात आलेल्या स्थानांची आणि यूपीमध्ये सक्रीय असलेल्या स्लीपर सेलची माहिती मिळालीय. यानंतर, पोलिसांनी स्लीपर सेलला पकडण्यासाठी ऑपरेशनवर भर दिलाय. या दहशतवाद्यांना १९ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. यातील एका संशयित दहशतवाद्याचं नाव अब्दुल अजीज आहे. नोएडाच्या सेक्टर २० जवळ एका पेट्रोल पंपानजिक त्याला अटक करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये १७ डिसेंबर रोजी पकडल्या गेलेल्या रक्तुल्ला नावाच्या संशयित दहशतवाद्यानं दिलेल्या माहितीवरून अजीजला अटक करण्यात आली.

अत्यंत गुप्त पद्धतीनं केलेल्या या ऑपरेशनची कुणकुणही कुणाला लागली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर रोजी या संशयितांना एका कोर्टात हजर करण्यात आलं. इथून त्यांना पश्चिम बंगालमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पश्चिम बंगालच्या कोर्टासमोर सादर केलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर धाडण्यात आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, रक्तुल्ला बांग्लादेशच्या फरीदकोटचा रहिवासी आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी तो भारतात दाखल झाला होता. आयबी आणि रॉनं केलेल्या चौकशीनंतर पश्चिम बंगालच्या पोलिसांनी दोघांना कोर्टात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर घेतलं. या अटकेवर सर्वच एजन्सींनी मौन पाळलं आणि त्यांची सलग चौकशी करत त्यांच्याकडून अजून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version