Home Top News जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी लागेल तेवढा निधी – फडणवीस

जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी लागेल तेवढा निधी – फडणवीस

0

सिंदखेडराजा, जि. (बुलडाणा) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागितली आणि मुख्यमंत्री झालो. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. माझ्या हातून सुराज्य घडो, अशी भावना व्यक्‍त करून जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले; तसेच मराठा आरक्षणाबाबत शासन कटिबद्ध असून, ते मिळणारच या विश्‍वासाने 16 टक्के जागा रिक्‍त ठेवल्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी केले.
फडणवीस म्हणाले, की जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 250 कोटी रुपयांचे नियोजन केले आहे. त्यांनी लागेल तेवढा निधी घेऊन जिजाऊसृष्टीला सुंदर बनवावे. राज्यातील गड आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाशी मी स्वत: समन्वय साधून प्रयत्न करेन. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचेही मार्गदर्शन घेतले जाईल, असे ते म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, की छत्रपतींना घडविणाऱ्या जिजाऊ देशासाठी आदर्श आहेत. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे.
पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे सांगून सिंदखेडराजाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी स्तरावर आराखडा तयार केला असून, एक कोटी रुपये ताबडतोब देणार असल्याचे सांगितले.
या वेळी “शिवधर्मा‘चे संस्थापक पुरुषोत्तम खेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले, खासदार प्रताप जाधव, आमदार पांडुरंग फुंडकर, रक्षा खडसे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, आकाश फुंडकर, हेमंत पाटील, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, रेखा खेडेकर, नगराध्यक्ष नंदा मेहेत्रे उपस्थित होते.
गडकरींविरोधात घोषणाबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजवाड्यावर दर्शनासाठी आले असताना काही कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

error: Content is protected !!
Exit mobile version