गोंदिया-केंद्राच्या मार्ग परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नुकतेच राज्यात सहा राष्ट्रीय महामार्ग घोषित केले असून विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, व गोंदिया जिल्ह्य़ातील मार्गांची जोडणी नवीन राष्ट्रीय महामार्गाला करण्यात आली आहे.
केंद्राच्या मार्ग परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने जिल्ह्य़ातील मार्गाची विस्तृत माहिती जिल्ह्य़ाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती आहे. केंद्रात भाजपची सत्ता स्थापन होताच मार्ग परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित केले. दळणवळणासाठी अधिक सोयीचे होण्यासाठी नविनीकरण करून जिल्ह्य़ातील मार्गांची जोडणी या नवीन राष्ट्रीय महामार्गाना करण्यात आलेली आहे. राज्यातील वणी-वरोरा-चंद्रपूर-मूल-गडचिरोली-धानोरा-छत्तीसगड हा २८० किलोमीटरचा नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० करण्यात आला आहे. हैदराबाद व छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणारा हा मार्ग यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या विदर्भातील तीन जिल्ह्य़ातून जात आहे. गडचिरोलीत तर नक्षलग्रस्त भागातून छत्तीसगड राज्यातील बस्तर विभागात हा मार्ग जात आहे. दुग्गीपार-गोंरेगाव-गोंदिया हा ४४ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ करण्यात आला. मलकापूर-बुलढाणा-चिखली-देऊळगावराजा-औरंगाबाद हा २०५ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ए घोषित करण्यात आला. निजामपूर-नंदूरबार-तळोदा-अक्कलकुरा-देदीपाड-गुजरात हा १०८ किलोमीटरचा नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बी करण्यात आला. वदखल ते अलिबाग हा २९ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ए, तर दुधाणी ते अक्कलकोट-सोलापूर हा ६९ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५० घोषित करण्यात आला. नवीन घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० च्या चंद्रपूर-मूल-गडचिरोलीची लांबी ७२ किलोमीटर येत असून मार्गावरील चार पूल चांगल्या स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच वेळी सहा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाल्याने या सर्व महामार्गांचा विकास होणार आहे.
राज्यात सहा नवे राष्ट्रीय महामार्ग
वाढदिवसाच्या शुभेच्छा