मराठा आरक्षण : सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादीची दांडी

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या संदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसनं दांडी मारल्यामुळं सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीला आरक्षणाबद्दल देणं-घेणं आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.हायकोर्टानं काल मराठा आरक्षणाला स्थगिती देताना काही मुद्दे नोंदवले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकार 50 टक्के एकुण आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असं कोर्टानं नोंदवलं आहे.
सरकारची सुप्रीम कोर्टात धाव :
दरम्यान मंत्रालयात झालेल्या या बैठकीत उच्च न्यायालयाच्या स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच याप्रश्नी कायदेतज्ज्ञांची एक समिती बनवण्यावर देखील एकमत झालं आहे. त्यासोबतच मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत सर्वपक्षीय समिती बनवण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे
सरकारला घेरण्याचा राष्ट्रवादीचा डाव?
आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारला घेरणाऱ्या राष्ट्रवादीनं सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारल्यानं सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. याबैठकीला भाजपसह शिवसेना, काँग्रेस, रिपाइं, शिवसंग्रामचे नेते उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीनं या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.