‘आयुष्मान भव’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

0
6

गोंदिया, दि.13 : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आरोग्य विभागाकडून जिल्हाभरात “आयुष्मान भव” मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आला.

          जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

         यावेळी ‘आयुष्यमान भव’ जिल्हास्तरीय कार्यक्रम समारंभाच्या अनुषंगाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड चंपा ठाकरे, फुलीचंद राकसे, योगराज बघेले, गुलशन बावणथडे, मनिष बोरकर यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड वितरीत करण्यात आले. यावेळी अवयवदान बाबत सामुहिक शपथ घेण्यात आली.

         क्षयरुग्णास उपचारासोबत पोषक आहाराची आवश्यकता असते. त्यामुळे प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान मोहिमेंतर्गत जयंत ठवरे, भावना सोलंकी, पल्लवी भुजाडे, सुरेश ठवकर यांनी क्षयरुग्णास उपचारासोबत अतिरिक्त पोषण आहार किट देवून सहकार्य केल्याबद्दल ‘आयुष्यमान भव’ जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते आभारपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आरोग्य विभागाच्या उपचारामुळे क्षयरोगमुक्त झालेले युवक धीरज मंडपे यांचा सुध्दा यावेळी पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी.जायस्वाल, जिल्हा मौखिक अधिकारी डॉ.अनिल आटे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात, जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे यांचेसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मीना वट्टी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी मानले.