नुकसानग्रस्त जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून द्या-विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

0
99

भंडारा दि. 19 : अतिवृष्टी व अवेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त लोकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. शासनाने घोषित केलेल्या मदतीचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, अशा निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले. लाखनी येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसिलदार मलिक विराणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानतोडे, गटविकास अधिकारी जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे  व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे  ऑगस्ट व ऑक्टोंबर मध्ये लाखनी तालुक्यात 4 हजार 837 शेतकऱ्यांचे 1743 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला असून भरपाईचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. 2 हेक्टरपर्यंत 18 ते 20 हजारापर्यंत मदत देण्यात येणार असून ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मदत वाटपाची कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश नाना पटोले यांनी दिले.

त्याचप्रमाणे 537 अंशत: 90 मोठया प्रमाणात तर 18 पुर्णत: अशे एकूण 645 घरांचे नुकसान झाले आहे. 79 गोठ्यांचे सुद्धा नुकसान झाले असून यासाठी 61 लाख 43 हजार 100 रूपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. पुर्णत: घराचे नुकसान झालेल्या व्यक्तींना 95 हजार 100 रूपये तर अंशत: घराचे नुकसान झालेल्या व्यतींना 6 हजार रूपये असे भरीव सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी अशा सुचना पटोले यांनी दिल्या.

नुकसानीचे सर्वे करतांना सुटुन गेलेले शेतकरी, नुकसानग्रस्त व्यक्ती व पशुधन याबाबीचा पून्हा सर्वे करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश नाना पटोले यांनी यंत्रणेला दिले. हा अहवाल प्राप्त होताच सुटून गेलेल्या व्यक्तींना शासन स्तरावरून मदत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत संजय गांधी योजनेअंतर्गत श्रावणबाळ व वृध्दापकाळ योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, आर्थिक मदत वाटप सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे केलेले धान्य वाटप, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वितरीत केलेले धान्य ऑगस्ट महिण्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतपिके व फळबागाचे नुकसान अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला.

नैसर्गिक संकटातून शेतकरी व माणूस उभा करण्यासाठी शासनाची मदत असून प्रशासनाने समन्वयाने लोकांना सहकार्य करावे. नुकसानग्रस्त पात्र व्यक्तींना जास्तीत जास्त लाभ मिळावा ही मानसिकता ठेवून काम करणे आवश्यक आहे. असे नाना पटोले यांनी सांगितले. नागरिकांना सहकार्य करणे आपले कर्तव्य असून लोकांची कामे वेळेत व विनाविलंब करण्याला प्राधान्य द्यावे असे त्यांनी सांगितले.