नक्षल प्रभावित 51 गावातील आदिवासींसह पोलीस साजरी करणार दिवाळी

0
86

गोंदिया,दि.27 : भारतीय संस्कृतीत दिवाळी सर्वात मोठे व महत्वाचे सण आहे. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करतो. परंतु, यावर्षी पोलीस जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व दिशेत पसरलेल्या 51 गावांतील आदिवासी नगरिकांसह दिवाळी साजरी करण्याचा निर्धार अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केला आहे.यासाठी सामाजिक संघटनांसह इतरांना भेटवस्तू व साहित्य 12 नोव्हेंबरपर्यंत देवरीतील अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात गोळा करण्याचे आवाहनही केले आहे.विशेष म्हणजे गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे उपमहानिरिक्षक संदिप पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून गडचिरोली जिल्हा पोलिसांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे.

या 51 नक्षल प्रभावित गावांची लोकसंख्या 10 हजार 976 आहे. या आदिवासी गावांमध्ये शिक्षण घेणारी मुले व इतर लोकांची दयनीय स्थिती आहे. या गावांमध्ये नक्षलवाद्यांची क्रियाशीलता दिसून येते. आदिवासी नागरिक आपल्या उत्पन्नानुसार आपली व कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करतात. त्यांना अधिकतर वेळी अर्धनग्न अवस्थेत राहावे लागते. एकीकडे आधुनिक युगात विकासाची गती वाढत असताना दुसरीकडे आदिवासी भाग अद्याप मागासलेलाच आहे. या समाजाला मूलभूत सुविधांची गरज आहे. प्रेमाची आवश्यकता आहे.

या बाबींकडे लक्ष देत जिल्हा पोलीस विभागाद्वारे आदिवासी बांधवांसह दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी नागरिक, त्यांच्या मुलांना मदत मिळावी, यासाठी पोलीस विभागाद्वारे उल्लेखनीय पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिक सुद्धा मदत करू शकतात.

याद्वारे होऊ शकेल मदत 

नागरिक आदिवासी मुले, नागरिकांसाठी नोटबुक, डायरी, पेन्सिल, रबर, शार्पनर, जेवणाचा डबा, बॅग, कंपास, सोलार लॅम्प, लहान बालकांचा बेड, शर्ट, पॅंट, बांगड्या, जोडे, चप्पल, सपोर्ट टी शर्ट, पॅंट पीस, स्टील ग्लास, भांडी, गोड वस्तु, सामान्य ज्ञान पुस्तके, कथा-कादंबरी, आत्मचरित्रावर आधारित पुस्तके, क्रिकेट बॅट, बॉल, वॉलीबॉल, फूटबॉल, बॅटमिंटन, कॅरम बोर्ड, बॅटमिंटन नेट आदि वस्तू नागरिक भेटस्वरुपात देऊ शकतात.