सडक अर्जुनी,दि.31ः तालुक्यातील कोसमतोंडी हे गाव शेवटच्या टोकावर असुन नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाला लागुन आहे. या परिसरात कोसमतोंडी हे गाव सर्वात मोठे गाव आहे.कोसमतोंडी येथे पोलीस स्टेशन व्हावे ही फार जुनी मागणी असुन लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे.परिसरात अनेक समस्या आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या परिसरातील अनेक समस्या सुटू शकल्या नाहीत.कोसमतोंडीला जोडणारे लहान-मोठे १० ते १५ गावांची मागील अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी असून ती पूर्ण होऊ शकली नाही.परंतू आजच्या स्थितीत या ठिकाणी पोलीस स्टेशन असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सदर परिसर अतिदुर्गम व नक्षल क्षेत्रामध्ये येत असल्याने कोसमतोंडी ला लागून मुरपार, लेंडेझरी, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला, टेमणी,हेटी, गिरोला,घटेगाव, मुंडीपार(ई), सितेपार,सितेपार,डुंडा,पांढरी,रेंगेपार,मालीजुंगा,धानोरी,शिवनटोला,किसनटोला हे सर्व गाव कोसमतोंडीला जोडली जाऊ शकणारी गावे आहेत.
कोसमतोंडी हे गाव डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असुन २५ किमी. लांब अंतरावर आहे.कोसमतोंडी येथे दोन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय,एक जि.प.प्राथमिक शाळा,बॅंक ऑफ महाराष्ट्र,सेवा सहकारी संस्था आहे. कोसमतोंडी वरून भंडारा जिल्ह्याची सीमा एक किलोमीटर अंतरावर असून राज्यमार्ग क्र.३५७ गोंदिया व भंडारा जिल्ह्याला जोडणारा मार्ग जातो.कोसमतोंडी बायपास १७ किमी. मुरदोली -कोहमारा-गोंदिया मार्गाला जोडलेला आहे.या मार्गाने रात्र-दिवस वाहनांची वर्दळ असते.सदर मार्ग भंडारा जिल्ह्यातील लाखनी-सालेभाटा-एकोडी असा ४० किमी.च्या मार्गावर कोणत्याच प्रकारची चौकी नसल्याने या मार्गावर रात्री ट्रकद्वारे अवैध रेती, इमारती लाकडे ,अवैध दारू आणि कटाईला जाणारे जनावरांची वाहतूक केली जाते.तसेच या परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे प्रलंबित असतात.आणि अनेक तक्रारीची दखल सुद्धा घेतली जात नाही.त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.त्याकारणाने लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील पोलीस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत सहा बीट आहेत. डुग्गीपार,कोकणा बीट १०किमी.,सौंदड बीट १० किमी.,डव्वा बीट ११ किमी., पांढरी बीट १५ किमी.,कोसमतोंडी बीट २५ किमी. असुन थाडेझरी गाव कोसमतोंडी वरून ५ किमी.अंतरावर शेवटच्या टोकावर आहे. कोसमतोंडी पांढरी बीट मिळून ३५ ते ४० गाव आहेत. सदर परिसर आदिवासी व अतिदुर्गम ग्रामीण भाग असल्यामुळे कोसमतोंडी या ठिकाणी पोलिस स्टेशन देण्यात यावे.तसेच पांढरी कोसमतोंडी परिसरातील ३५ ते ४० गावांतील बेरोजगार तरुण अवैध दारू आणि सट्ट्याचे आहारी जात आहेत. सदर परिसरात अवैध धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत असुन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.अवैध धंद्यावर वचक बसविण्यासाठी पोलिस स्टेशन ची गरज आहे.अनेक दिवसांपासून असलेली पोलीस स्टेशन ची मागणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पूर्ण करावी,अशी परिसरातील नागरिकांनी मागणी आहे.