
गोंदिया,दि.9-पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीसाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघ-2020 च्या निवडणूकीचा कार्यक्रम 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला. त्यादिवसा पासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
आज 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-2020 चा आढावा घेण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, 2 नोव्हेंबर 2020 पासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी निवडणूकीसंबंधी दक्षतापूर्वक काम करावे. या काळात कोणतेही नवीन काम सुरु करता येणार नाही. तसेच नविन कार्यादेश व नविन निविदा काढता येणार नाही. आचारसंहितेमुळे फक्त यापूर्वी मंजूर असलेली व सुरु असलेली कामे करता येणार आहेत. पोलीस विभागाने Law and Order ची योग्य ती अंमलबजावणी करावी. शासकीय वाहनाचा राजकीय वापर होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. या काळात कोणतेही शासकीय कार्यक्रम घेता येणार नाही. कोणताही अधिकारी रजेवर जाणार नाही तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कुठल्याही अधिकाऱ्यांनी राजकीय लोकप्रतिनिधींना भेटायचे नाही. या काळात व्हिडिओ कॉन्फरन्स घेता येणार नाही. उमेदवारांच्या जाहिरातीचे सर्टिफिकेशन होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा स्तरावर माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून उमेदवारांनी या समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. गेस्ट हाऊसमध्ये राजकीय बैठक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. एखादया ग्राऊंडमध्ये सभा होत असेल तर त्याची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. लाऊडस्पीकरला परवानगी घेणे आवश्यक आहे. रोड शो ला कोविड-19 चे सर्व अटी व शर्ती लागू राहतील. शासकीय स्तरावर कुठल्याही जाहिराती दयायचे नाही. पैसे किंवा दारु वाटप यावर प्रतिबंध आहे. धार्मिक स्थळांचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही. लाऊडस्पीकरचा वापर फक्त सकाळी 6 पासून ते रात्री 10 या कालावधीतच करावे. शासकीय वाहन कुठल्याही राजकीय कामासाठी वापरता येणार नाही. या काळात कुठलाही नवीन कार्यक्रम घेता येणार नाही. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) राजेश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) आर.जे.चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्र.मा.कचवे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अब्दूल जावेद, कोषागार अधिकारी एन.एस.भंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) पी.व्ही.बुलकुंडे, सहायक जिल्हा उपनिबंधक (नोंदणी व मुद्रांक) आर.बी.मुळे, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) एच.बी.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी एन.एच.चव्हाण, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्र.मि.साळुंखे, उद्योग अधिकारी आर.एन.पाटील, जि.प.समाजकल्याणच्या सहाय्यक सल्लागार वैशाली तायडे, सहायक प्रकल्प अधिकारी आर.पी.मिश्रा, पोलीस निरिक्षक वैशाली पाटील व राजु मेंढे, समाजकल्याणचे सहायक लेखा अधिकारी डी.एम.टेकाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रिकापुरे, लिना फाळके, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हि.आर.रिसे उपस्थित होते.