यवतमाळ , दि. 11 : जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर 2020 या कालावधीत झालेल्या अवेळी व सततच्या पावसामुळे आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे महसूल प्रशासनाला आदेश देणे तसेच नुकसान भरपाई करीता निधी उपलब्ध करुन देणे या बाबीही वनमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी मांडल्या.
यवतमाळ जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2020 या काळात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हास्तरीय अहवाल यापूर्वीच शासनास सादर करण्यात आला होता. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबर 2020 या कालावधीत काही मंडळांमध्ये 65 मि.मी. पेक्षा कमी पाऊस झालेला असतांना देखील मोठे नुकसान झाले होते. मात्र 65 मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या समितीला संयुक्त पथकामार्फत पंचनामे करता येत नाहीत व त्यामुळे शासनाकडून पुढील आदेश मिळावेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे केली होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी याबाबत पंचनामे व्हावेत व निधी मिळावा अशी आग्रही मागणी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे वेळोवेळी केली होती.
यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर 2020 मध्ये अवेळी पडलेल्या संततधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तसेच कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत याबाबत वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा केली व याबाबत नुकसानभरपाई करीता प्राथमिक अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी कळविल्याप्रमाणे 315 कोटी निधी उपलब्ध देण्यात यावा अशी आग्रही मागणी केली.