कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण-जिल्हाधिकारी संदीप कदम

संशयीत रुग्णांची तपासणी ;;; कुष्ठरोग बरा होणारा आजार ;;; 1 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान सर्वेक्षण

0
110

भंडारा दि. 19: नवीन कुष्ठरुग्ण शोधुन त्याला पुर्ण कालावधीचा मोफत औषधोपचार देऊन विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी 1 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान भंडारा जिल्ह्यातील 547 गावातील 9 लाख 23 हजार 870 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.

            सक्रीय कुष्ठरोग शोध व नियमित संनियंत्रण कार्यक्रम राबविण्याबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, सहायक संचालक सेवा (कुष्ठरोग) डॉ. राजेंद्र खंडागळे यावेळी उपस्थित होते.

            1 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून घरामधील सर्व सभासदांची कुष्ठरोग आजारासाठी तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी 870 आशा व स्त्री स्वयंसेवक व 225 पुरुष स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 547 गावातील 9 लाख 23 हजार 870 नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे: • त्वचेवर फिकट/ लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे. • जाड, बधिर तेलकट/ चकाकणारी त्वचा. • त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे. • भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे. • तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे. • हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे. • त्वचेवर थंड व गरम संवेदना जाणवणे. • हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालतांना पायातुन चप्पल गळुन पडणे. वरील लक्षणे असल्यास सर्वेसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना अवगत करावे. आजार लपवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.