
वर्धा,दि.१६ः जिल्हयातील 32 अपघात प्रवण स्थळांमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हामार्ग आदी रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्तीचे प्रस्ताव संबंधीत विभागांनी तातडीने सादर करुन आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश खा. रामदास तडस यांनी संसद सदस्य रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये दिले. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार 18 जानेवारीपासून पुढील 30 दिवस रस्ते सुरक्षा महिना वर्धा व अमरावती जिल्हयात चांगल्या प्रकारे आयोजीत करावा व त्या माध्यमातुन रस्ते सुरक्षा संबधीत जनजागृती करण्याकरिता प्रशासनाने व समितीच्या वतीने सकारात्मक प्रयत्न करावे, असे आवाहन देखील यावेळी खा. तडस यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खा. रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात झाली. यावेळी बैठकीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंभे आदींची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रातील निगडीत रामा क्रमांक 361 वरील रस्ते सुधारणा, राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग पोलिस ठाणे अथवा चौकी निर्माण करणे, जिल्ह्यात रस्ते सुरक्षा समितीच्या पुढाकारातुन ट्रॅफीक पार्कची निर्मीती करणे, अपघाताची आकडेंवारी करण्याकरिता प्रत्यक्ष आवश्यक उपाययोजना करणे, सिंदी (रेल्वे), आर्वी शहर येथे नवीन बाह्य वळण रस्त्याची निर्मिती आदी अनेक विषयावर बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील अपघात कमी होण्याकरिता तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती तातडीने होण्याकरिता उपस्थित अधिकार्यांनी प्राकलन तयार करुन मंजुरीकरिता सादर करावी, 1 फेबु्रवारी रोजी या विषयीचा सविस्तर आढावा घेतला जाईल. ट्रॅफिक पार्क निर्मीतीकरिता जागेची पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विवके भीमनवार यांनी दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागचे उपअभियंता गुर्वे, महामार्ग पोलिस विभागाचे उपअधीक्षक पांडे, अशासकीय सदस्य किरण उकांदे, प्रणव जोशी, शिरीष भांगे आदी उपस्थित होते.




