
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी सुरू झाली आहे मात्र गोदाम मधील धानाची उचल न झाल्याने धान खरेदी संथ गतीने सुरू आहे. यंदा रबी हंगामात ६५ हजार हेक्टर शेतीतून जवळपास ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्याची धान साठवण क्षमता ४ ते ५ लाख क्विंटल असल्याने खरेदी केलेले धान ठेवायचे कुठे असा प्रश्न समोर आहे. सध्या लॉकडाऊन मुळे सर्व जिल्हापरिषद तसेच नगरपालिकेच्या शाळा बंद आहेत. त्या जागेचा उपयोग धान साठवण करण्यासाठी करता येऊ शकतो. यामुळे शाळेला उत्पन्न देखील मिळेल. असे पत्र गोंदियाचे जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिले आहे. धान साठवण करण्यासाठी जिल्हापरिषद आणि नगर पालिकेच्या शाळा उपलब्ध करून दिल्यास धानाची उचल होईल आणि येणारा पावसाळा पाहता धान खराब होण्यापासून सुरक्षित ठेवता येईल तसेच शेतकरी बांधव चिंतामुक्त होऊन आनंदाने खरीप हंगामची तयारी करू शकेल असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला.