
🖋️**वन्यप्रण्यांची मानवी वस्तीकडे धाव
कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):–– सडक अर्जुनी तालुक्यातील नदी-नाले व तलाव कोरडे पडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.यावर्षी तापमान वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर होत आहे.नदी-नाले, तलाव ,लहान बोड्या कोरडे पडल्याने मानवासह वन्यप्रण्यांची सुद्धा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तसेच जंगलातील पाणवठे सुद्धा कोरडे पडले असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.वाढते तापमान व पाण्याअभावी वन्यप्रण्यांचा मृत्यू सुद्धा होत आहे.तालुक्यात वशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पुर्णपणे कोरडे पडले आहेत. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यावर्षी एप्रिल महिन्यात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षीच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे.त्यामुळे जंगलातील वन्यप्रण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत आहे.पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगव्या सारख्या वन्यप्रण्यांचा मृत्यू झाला आहे.यामुळे वन आणि वन्यजीव विभागाचे उपाययोजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात २५६ पाणवठे असून त्यापैकी ७८ नैसर्गिक स्त्रोतांचे तर १५४ कृत्रिम पाणवठे आहेत.२४ तलावही या क्षेत्रात आहेत.१५४ कृत्रिम पाणवठ्यात पाणीपुरवठा व्हावा यासाठी१४९ हातपंप तयार केले आहेत.त्यापैकी ११० हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत.१३ पाणवड्यात तीन टॅंकर चे साहाय्याने पाण्याची सोय केली जात आहे.वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागाचे अधिका-यांचे म्हणणे आहे.तर वन्यप्रेमींनी जंगलातील कुठल्याच पाणवठ्यात पाण्याची सोय करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे.काही निसर्ग प्रेमी संस्थांनी आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टॅंकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती दिली.
नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील थाडेझरी गावाजवळील तलाव पूर्णतः कोरडा पडला आहे.सन १९९८ पासून थाडेझरी येथील तलावाचे वन्यजीव विभागाने खोलीकरण केले नाही.थाडेझरी पासून नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प सात किमी.अंतरावर आहे.थाडेझरी हे गाव पुनर्वसीत गाव आहे.तलावाचे खोलीकरण करण्यात आले नसून तलाव पूर्णतः कोरडा पडला आहे.त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.यामुळे वन्यप्राण्यांची शिकार करण्याचे घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच थाडेझरी येथील लोकांचे कल्याणासाठी वनसमितीचे पैसै खर्च न करता नागझिरा अभयारण्यात टॅंकर घेऊन वन्यप्रण्यांना पाणीपुरवठा करतात.तसेच कॅम्पवर सुद्धा शौचालय आहेत.उल्लेखनिय म्हणजे कोट्यावधी रुपये वन्यप्राण्यांच्या पिण्याचे पाण्यासाठी व जोपासण्यासाठी शासनाकडून निधी मिळून सुद्धा अधिकारी वनसमितीचे पैशांवर डल्ला मारतात.