Home विदर्भ पीक कर्जासाठी शेतकर्‍यांचा साखळी उपोषनाचा इशारा

पीक कर्जासाठी शेतकर्‍यांचा साखळी उपोषनाचा इशारा

0

– सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन

अर्जुनी मोर-कर्ज वसुली व इतर कारणे पुढे करुन जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेची अर्जुनी मोर शाखा बँकेच्या सभासद शेतकरी सदस्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. परिणामी शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीककर्ज तातडीने न मिळाल्यास 29 ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. तसे निवेदन बँकेचे शाखा व्यवस्थापक टेेकचंद परशुरामकर यांना दिले आहे.
निवेदनानुुसार, तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत बँकेत नवीन सभासद नोंदणी करण्यात आली. सभासद मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना बँकेने सभासदत्व दिले. या सभासदांना नियमाप्रमाणे बँकेनी पीककर्ज द्यायला हवे. मात्र विविध कारणे सांगून शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच ज्या सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकर्‍यांना देखील बँक पीककर्जापासून वंचित ठेवत आहे. विशेष म्हणजे, कर्ज वसुलीमध्ये जिल्ह्यात तालुक्याची वसुली 80 टक्क्यांच्या वर आहे. असे असतानाही शेतकर्‍यांना पीककर्जापासून वंचित ठेवणे शोकांतिका आहे. मागील वर्षीच्या खरिपाचा बोनस तसेच या वर्षीच्या रब्बीचे चुकारे शासनाने अद्यापही दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यात बँक पीककर्ज देण्यास टाळाटाळा करीत असल्याने शेतकर्‍यांना व्यापारी, सावकारांकडून उसनवार घेऊन पीक घ्यावे लागत आहे. या बाबींचा विचार करून जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने नवीन सभासद, कर्जमाफी लाभार्थी सभासद आणि वारसान सभासदांना त्वरित कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांची आहे. यावेळी बँकेचे संचालक भोजराम रहिले यांनी निवेदनकर्त्यांशी चर्चा केली. निवेदन देताना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक ललित बाळबुद्धे, नाना शहारे, तुलाराम लांजेवार, मधुकर पर्वते, सभासद रमेश झोडे, किशोर शहारे, अरुणा मस्के, केशव खोब्रागडे, नीलकंठ शाहारे उपस्थित होते.
.
वरिष्ठांचा आदेश आला की प्रक्रिया करू- परशुरामकर
यासंदर्भात बँकेचे शाखा व्यवस्थापक परशुरामकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, या विषयावर वरिष्ठांशी चर्चा करून मुख्यालयाचे आदेश मिळाल्यानंतर आपणास नवीन सभासदांना कर्ज वाटपाविषयी कळविण्यात येईल. या प्रक्रियेला दहा दिवसांचा अवधी लागू शकतो, असे त्यांनी सांगितले.

 

Exit mobile version