सीईओच्या दडपशाहीविरुद्ध ग्रामसेवक संघटनेचा एल्गार

0
158

गोंदिया, दि.20 : मागील कित्येक दिवसांपासून ग्रामसेवकांच्या समस्या मार्गी लावल्या नाही. केवळ संघटनांना चॉकलेट देवून संघटनेच्या पदाधिकार्‍यांना टार्गेट केले जात आहे. दहशत पसरवून कामे करवून घेणे व चूक नसतानाही निलंबनाची कारवाई करणे अशा प्रकारांनी त्रस्त झालेल्या ग्रामसेवकांनी गोंदिया जिल्हा परिषदेच्या सीईओच्या दडपशाहीविरुद्ध एल्गार पुकारला आहे. 17 ऑगस्टपासून संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले असून तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी-ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत.

ग्रामसेवक यूनियनचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियनचे विभागीय सचिव कमलेश बिसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्हा परिषदेत कार्यरत सीईओ दडपशाही मार्गाने अरेरावीपणे वागत आहेत. जिल्हा परिषद बॉडी नसून तेच प्रशासक आहेत. त्यामुळे कोणत्याही नेत्याला ते जुमानत नाही. ग्रामसेवक युनियन वगळता कुणीच त्यांच्या दडपशाहीला विरोध न करता निमुटपणे त्यांच्या दहशतीमध्ये कामे करतात. मात्र ग्रामसेवक युनियनने सुरुवातीपासूनच त्यांच्या दडपशाहीला विरोध केला आहे.

मागील अनेक दिवसांपासून कोणत्याही प्रवर्गची पदोन्नती असो, अनुकंपा भरती असो, कालबद्ध पदोन्नती असो किंवा इतर आस्थापनाविषयक बाबी असो, त्या जि.प. सीईओ यांनी केल्या नाही. केवळ सर्व प्रवर्ग संघटनांना चॉकलेट देऊन संघटनेच्या पदाधिकार्‍यांना टार्गेट करून दडपण घातले जात आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आदर्श शिक्षक नेते संदीप तिडके यांचा नाहक बळी यांनी घेवून संघटनांना दाबण्याचा षड्यंत्र यांनी रचला आहे. अनेकांवर आपला धाक बसवून, चूक नसतानाही निलंबनाची कारवाई केलेली आहे. काम वाटप संदर्भातही घोळ केलेला आहे, असा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या दडपशाहीत विभाग प्रमुखही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. याबाबत संघटनेने खेद व्यक्त केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून ग्रामसेवक युनियन कर्मचार्‍यांच्या आत्मसन्मानाच्या लढाईत प्रातिनिधिक स्वरुपात उतरली आहे. मागील एक महिन्यापासून असहकार आंदोलन सुरू आहे. 17 ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून सर्व पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलन दडपण्याचा सीईओंचा प्रयत्न

ग्रामसेवक यूनियनने सुरू केलेले आंदोलन दाबून टाकण्याकरिता सीईओ यांनी पोलिसांचा वापर केला. गेल्या आठवडय़ापासून सर्व तालुका अध्यक्ष, सचिव यांना पोलीस विभागाकडून कलम 144 व साथरोग प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे नोंद करण्याची नोटिस दिली आहे. सीईओ यांच्या दबावात पोलीस करवाईच्या भूमिकेत होते.

मात्र गोंदिया जिल्हा यूनियन या धमक्यांना भीक न घालता आपल्या आंदोलनावर कायम आहेत. एवढे मेळावे, राजकीय सभा होतात, त्यांचावर गुन्हे नोंद न करता लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनावर गुन्हे नोंद करीत असतील तर आमची तुरुंगातही जाण्याची तयारी आहे. मात्र सीईओचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आपल्या न्याय मागण्या पूर्ण केल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी टोकाची भूमिका ग्रामसेवक यूनियनने घेतली आहे.

Movement of Gramsevak Union 2
आमगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देताना ग्रामसेवक यूनियन शाखा आमगावचे पदाधिकारी.

गटविकास अधिकार्‍यांना दिली आंदोलनाची पूर्वसूचना

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना गोंदिया जिल्हा शाखेच्या आवाहनानुसार, आमगाव तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी-ग्रामसेवक 17 ऑगस्टपासून धरणे आंदोलनात सहभागी होत आहेत, असे निवेदन पूर्वसूचना म्हणून ग्रामसेवक यूनियनच्या आमगाव शाखेने गटविकास अधिकार्‍यांना दिले आहे.

या वेळी तालुका शाखा आमगावचे अध्यक्ष शैलेश परिहार, उपाध्यक्ष विजय बिसेन, महिला उपाध्यक्ष संध्या भाजीपाले, सहसचिव हेमंत लेंडे, कोषाध्यक्ष संतोष कुटे, सल्लागार ईश्वर लांजेवार, किशोर वैष्णव, कायदेविषयक सल्लागार योगेश कटरे, सदस्य अविनाश रहांगडाले, एस.एस. निघोट, सी.एस. वैद्य, पुष्पा चाचेरे, डिलेश्वरी बिरनवार व सरिता ब्रम्हवंशी उपस्थित होते. सर्व ग्रामविकास अधिकारी-ग्रामसेवक धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.