वैद्यकीय अधिकारीविना ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर…

0
89

विनोद सुरसावंत/ककोडी,दि.20ः- गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व आदिवासी परिसर असलेल्या देवरी तालुक्यातील ककोडी परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले.मात्र हे आरोग्य केंद्रच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीविना वाऱ्यावर असल्याचे चित्र बघावयास मिळत असून आरोग्य सेवा एैन पावसाळाच्या दिवसात कोलमडली गेली आहे.

विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात सन 2014 पासून आजपर्यंत कधीच पुर्णवेळ M.B.B.S. डाॅक्टर नियुक्त करण्यात आले नाही.याउलट 11 महिन्याचे कंत्राटी प्रशिक्षणार्थी B.A.M.S. डाॅक्टरच सेवा देत आले आहेत.परंतु गेल्या दोन महिन्यापासून एकही वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी नसल्याने कर्मचारीच डाँक्टर झालेले आहेत.देवरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड सिमेलगतचे हे आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रातर्गंत 6 उपकेंद्रासह लहानमोठी 37 गावे येत आहेत.यामध्ये  ककोडी, चिल्हाटी, मुरमाडी,कथलिटोला, तुमडीकसा, मेहताखेडा, कोसबी,रेहळी,केशोरी, ऊचेपुर,महाका,लेडींजोब,जपकसा,मिसपिरी,धमदीटोला, धोबाटोला,नवाटोला,कुनबिटोला, वडेकसा,चिपोटा,सोरीटोला, शम्भुटोला,गोटानपार,धवलखेडी या गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे अतिशय दुर्गम आदिवासी क्षेत्रात मोडली जातात,गावामध्ये पावसाळ्याच्या दिवसात मलेरिया,डेंग्युसारखे आजाराचे प्रमाण नेहमी अधिक राहिलेले आहे.अशा परिसरातील आरोग्य केंद्रात डाँक्टरच नसल्याने गर्भवती महिलांसह इतरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे दिसून येत आहे.त्यातच देवरी,गोंदिया येथे उपचाराकरीता जावे लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिस्यावर आर्थिक भार पडू लागला आहे.या आरोग्य केंद्रासाठी एमबीबीएस डाॅक्टरची 2 पदे स्थायी व बीएएमएस डाँक्टरचे 1 पद मंजूर आहे परंतु सध्या ही पदे रिक्त पडली आहेत.लवकरात लवकर आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले नाही तर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.