‘आझादी का अमृत महोत्सव’मध्ये सर्व विभागांचा सक्रीय सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

0
35
  • ३१ ऑगस्टपर्यंत कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना
  • विविध स्पर्धा, रॅली, श्रमदान कार्यक्रमाचे होणार आयोजन

वाशिम, दि. २०  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढील ७५ आठवडे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व शासकीय विभागांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक असून याविषयीचा कृती आराखडा ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. मैत्रवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे,  सहायक आयुक्त समाज कल्याण मारोती वाठ, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे,  महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्यासह अन्य कार्यालय प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, यावर्षी आपल्या देशाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत अंतर्गत पुढील ७५ आठवडे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती, या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती, देशाची विविध क्षेत्रातील आतापर्यंतची वाटचाल याविषयीची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा उपक्रम जिल्ह्यामध्ये व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने ७५ आठवड्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा कृती आराखडा तयार करा.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वाशिम जिल्ह्यात झालेल्या घडामोडींवर आधारित माहितीचे संकलन करावे. शिक्षण विभागाने यामध्ये पुढाकार घेवून ऐतिहासिक दस्तऐवज व इतर साधनांचा अभ्यास करून माहिती तयार करावी. या माहितीवर आधारित स्वतंत्र कॉफी टेबल बुक तयार करण्याचे नियोजन करण्यात येईल. यासोबतच ऑनलाईन चर्चासत्रे, व्याख्याने या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, तंत्रज्ञाना यासारख्या क्षेत्रांमध्ये देशाने केलेल्या प्रगतीची माहिती सुद्धा या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावी, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी सांगितले.

श्री. हिंगे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी जिल्हास्तरीय कोअर समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून जिल्हा माहिती अधिकारी समितीचे सदस्य सचिव आहेत. सर्व शासकीय विभागांनी आपल्या विभागांतर्गत ७५ आठवडे विविध उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक असून त्यादृष्टीने सर्वांनी कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमांतर्गत करावयाच्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली