सर्वाधिक लसीकरण झालेल्या पेंढरी ग्रामपंचायतला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

0
18

भंडारा,दि.26:- पेंढरी ग्रामपातळीवर अत्यंत चांगला समन्वय साधला जात असून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास चांगला प्रतिसाद सर्व स्तरातून येतांना दिसत असून लाखनी तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीने 518 एवढे लसीकरण एकाच दिवशी करुन एक नवा आदर्श सर्वच गावांसमोर निर्माण केला. या बाबीची विशेष दखल घेवून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्वतः पेंढरी ग्रामपंचायतीला भेट देऊन स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी, डेटा ऑपरेटर, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटिल या सर्वाचे अभिनंदन केले.

 प्र. तहसिलदार श्रीमती दोनोडे, गट विकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, समन्वयक नरेश नवखरे व गावातील सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

पेंढरी गावात 750 पेक्षा जास्त व्यक्तींना पहिला डोस देणे शिल्लक होते. मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रा.प. कर्मचारी, पोलिस पाटिल, रेशन दुकानदार, तंटामुक्त समिती सदस्य, ग्राम रोजगार सेवक, उमेद महिला बचतगटाचे सदस्य व नागरिकांची बैठक आदल्या दिवशी घेवून ग्रामपंचायतने केलेले योग्य नियोजन, प्रत्येक कुटुंबाच्या घरी आदल्या दिवशी दिलेली वैयक्तिक भेट, ग्रुप ने केलेले काम, डाटा एन्ट्री करण्यासाठी 6 व्यक्ती, प्रत्यक्ष लस देण्यासाठी 2 वैद्यकीय अधिकारी, सिस्टर, 10 व्यक्तींचा मदतनीस चमू, लसीकरणासाठी टोकन सिस्टम, आदल्या दिवशी दिलेली मुनादी, स्वतंत्र वाहनाव्दारे केलेली प्रचार-प्रसिध्दी व लसीकरणाच्या दिवशी शेतीकामास ग्रामस्थांची ऐच्छिक सुट्टी तसेच तालुका स्तरावरुन तालुका आपत्ती व्यवस्थापक कक्षाचे तालुका समन्वयक नरेश नवखरे यांनी पार पाडलेली विशेष जबाबदारी यामुळे इतक्या मोठया प्रमाणावर लसीकरण होवू शकले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे लाखनी तालुक्यात एक उत्साही वातावरण तयार झाले असून त्या अनुषंगाने 100 टक्के लसीकरणाचे उदिष्ट पुर्ण करण्यासाठी सर्व स्तरातून मदत होईल. असा आशावाद निर्माण झाला आहे. एका साध्या लहानशा गावात जिल्हाधिकारी भेट देऊन प्रासंगीक कौतुक करित आहेत ही तालुक्यासाठी मोठी बाब आहे.

लसीकरणाला तहसीलदार लाखनी श्रीमती दोनोडे, गटविकास अधिकारी पं.स.लाखनी डॉ.शेखर जाधव, तालुका आपत्ती समन्वयक नरेश नवखरे, एच.बि.कावळे, सरपंच राजेंद्र कुनभरे, उपसरपंच घनश्याम काळे यांचे मार्गदर्शनात लसीकरण मोहीम यशस्वी होणे करीता गावातील नागरीकांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर लसीकरण उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रा.प.कर्मचारी, पोलिस पाटील, उमेद प्रभाग समन्वयक भैसारे, उमेद महिला बचत गट यांनी सदर लसीकरणाकरिता सहकार्य केले.