Home विदर्भ राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची होणार चौकशी

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची होणार चौकशी

0

सिरोंचा – गडचिरोली – आरमोरी असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (सी) चे जिल्ह्यात बांधकाम सुरू आहे. सदरच्या बांधकामाचे कंत्राट असलेल्या कंपनी विरोधात यापूर्वी अनेकदा, अनेकांनी तक्रारी आणि आंदोलनांची भुमिका जाहिरपणे घेतलेली असतांनाही आपण या महामार्गाच्या बांधकाम आणि बांधकाम करणार्‍या कंपनीकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करून महामार्गाच्या ‘महाभ्रष्टाचाराला’ वाव दिलेला असून सदर कंपनी विरोधात तात्काळ कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावरचा आणि न्यायालयात आपल्या आणि बांधकाम कंपनीच्या विरोधात लढाई लढू,असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला होता. शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली असून बांधकामाची चौकशी होणार असल्याची माहिती शेकापच्या पदाधिकार्‍यांनी दिली.
शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री वेळदा, शेकाप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई सुनील कारेते यांनी कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले हे तक्रार पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, रस्ते वाहतूक विभागाचे केंद्रीय सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकण (रस्ते विकास) चे महासंचालक आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांनाही मेल द्वारे पाठविलेले होते. दरम्यान काल मुख्यमंत्री कार्यालयाने सदर तक्रारीची दखल घेत, कार्यवाही करीता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव यू.पी. देबडवार आणि परिवहन विभागाचे मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांना आदेश दिलेले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट बांधकाम आणि कार्यकारी अभियंत्यांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष प्रकरणी चौकशी होवून कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version