महामेट्रोच्या भरतीत बहुजनांवर अन्याय

0
33

नागपूर : महामेट्रोच्या पदभरतीत बहुजन समाजातील युवकांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महामेट्रोच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

महामेट्रोत संविधानिक तरतुदीनुसार एससी, एसटी, ओबीसींना पदे देण्यात यावी, या मागणीसाठी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात पुढील दोन निर्णय न घेतल्यास युवक व विद्यार्थ्यांची  रॅली काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. महामेट्रोने बहुजनांवर नोकरभरतीत अन्याय केला. महामेट्रोला ती चूक सुधारावी लागेल,  असे यावेळी शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके आणि नागपूर जिल्हा एनएसयूआयतर्फे अध्यक्ष आशीष मंडपे यांनी या आंदोलन सहभाग घेतला.यावेळी बॅनर आणि पोस्टर घेऊन युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी महामेट्रोच्या कार्यालसमोर घोषणा दिल्या. त्यानंतर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात महामेट्रोमध्ये स्थानिक सुशिक्षित युवा बेरोजगार व विद्यार्थी यांना ५० टक्के नोकरीत आरक्षण देण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवासासाठी विद्यार्थी पास सुरू करण्यात यावी.

यामध्ये  ५० टक्के सवलत देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी महामेट्रोच्या पदभरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला.अधिकाऱ्यांच्या उत्तराने आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे अखेर येत्या दोन दिवसात यावर निर्णय न घेतल्यास ११ सप्टेंबर २०२१ रोजी युवा आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अधिकार  रॅली काढण्यात येईल व नागपूर शहरातील मुख्य मेट्रो स्टेशन  जिल्हा एनएसयूआयतर्फे बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात अजित सिंह, इरशाद शेख यांच्यासह प्रामुख्याने प्रणय सिंग ठाकूर, चेतन मेश्राम, कुणाल चौधरी, सुबुजित कुंडू, रौनक नांदगावे, रॉयल गेडाम, सीमन गायकवाड, सतीश साखरे, हर्ष बर्डे, तेजस सोमकुंवर, सौरभ मौर्या, रोहन जैन, रोहन वांडरे, इशांत इंगळे, निशोद महाजन, मिथिलेश राजपांडे, अमिश पंडितपावर, तुषार गिरडकर तसेच एनएसयूआय पदाधिकारी उपस्थित होते.