पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार

0
35

अर्जुनी-मोरगाव : पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विलास निमजे यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शनर अदालत सभेचे आयोजन 8 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या वेळी पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार, अशी ग्वाही बीडीओ निमजे यांनी दिली.

याप्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकांच्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. पेन्शनर कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी डी.एस. लोहबरे, बालविकास विस्तार अधिकारी निखारे उपस्थित होते.

निवेदनातील मागण्या

दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारला पेन्शनर अदालत सभेचे आयोजन करण्यात यावे. सेवानिवृत्त मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांचे उपादान, अंशराशीकरण, रजा रोखीकरण, गटविमा, भविष्य निर्वाह निधी, प्रवास भत्ता बिल व इतर वेतन भत्ते तातडीने देण्यात यावे. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तातडीने एकरकमी पेन्शन देण्यात यावी. सेवानिवृत्तांचा सातवे वेतन आयोगाचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता रोखीने देण्यात यावा. सेवानिवृत्तांना तातडीने ओळखपत्र देण्यात यावे.

सेवानिवृत्त कर्मचारी कार्यालयात कामानिमित्त आल्यावर त्यांना सन्मानजनक वागणूक देण्यात यावी. सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक ओ.जे. वासनिक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिरालाल लांडगे, सेवानिवृत्त शिक्षिका लिला शहारे, मृतक परिचर भागवत सांगोळे यांची पेन्शन केस मंजुरी, सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस मृतक स्नेहलता गोपाल लाडे, यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या समस्या पेन्शन अदालत सभेत मंजुरीसाठी महासंघाद्वारे ठेवण्यात आले.सर्व समस्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले.