Home विदर्भ स्कायवॉक आकर्षण ठरणार असल्याने चिखलदऱ्यातील विकासकामे करावीत- राज्यमंत्री बच्चू कडू

स्कायवॉक आकर्षण ठरणार असल्याने चिखलदऱ्यातील विकासकामे करावीत- राज्यमंत्री बच्चू कडू

0
अमरावती –चिखलदऱ्यातील स्काय वॉक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांत वाढ होणार असल्याने याठिकाणी करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी सर्व विभागांनी येथील विकासकामे करावीत, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलदारा विकास आराखड्यातील विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रक्लप अधिकारी वैभव वाघमारे, धारणीचे तहसिलदार वैभव पाटोळे, चिखलदऱ्याच्या तहसिलदार श्रीमती माने आदी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले, चिखलदऱ्या उभारण्यात येत असलेला स्काय वॉक देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. स्काय वॉकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पुर्ण होणे गरजेचे आहे. स्काय वॉकवर जाण्यासाठी बिनतारी संदेशाच्या केंद्रासाठी दिलेली जमीन अधिग्रहित करावी किंवा इतर पर्याय तपासून पहावे. जमिन अधिग्रहण आवश्यक असल्यास त्यासाठी किती जमिन अधिग्रहित करावी लागणार आहे, हे तपासून थेट खरेदीने जमिन खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. विकास प्रकल्प पुर्ण झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळणार असल्याने जमिन अधिग्रहणासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे.
स्काय वॉकचे काम पूर्णत्वास येत आहे. केबलचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याचा पाठपुरावा करून परवानगी वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. स्काय वॉकवर जाण्यासाठी आवश्यक असलेली जागा कोणत्या प्रकारे उपलब्ध होईल, याची तपासणी करावी. चिखलदारा येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी येथील पर्यटक आणि रहिवाशी यांना लागणारा पाणीसाठी याची माहिती घेण्यात यावी.
स्काय वॉकमधून निश्चित उत्पन्न मिळण्याबाबत सिडको साशंक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चिखलदऱ्यातील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्काय वॉक हा पर्यटकांचे आकर्षण असण्यासोबतच देशातील एकमेव स्काय वॉक असणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञही याठिकाणी भेटी देणार आहे. स्काय वॉकसाठी लागणारा खर्च, त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती सिडकोला दिल्यास त्यांच्याकडून गतीने काम होण्यास मदत मिळेल, असेही श्री. कडू यांनी सांगितले.

Exit mobile version