Home विदर्भ कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करा-पालकमंत्री सुनिल केदार

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करा-पालकमंत्री सुनिल केदार

0
 चाचण्यांचे प्रमाण वाढवा
वर्धा,दि.१७(- :- जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरीपण धोका अजून टळलेला नाही. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून बधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करुन संपर्कातील प्रत्येकाची चाचणी करावी. तसेच बाधित व्यक्तींनी यापूर्वी लस घेतली आहे काय व कोणती लस घेतली आहे. याची व्यवस्थित माहिती ठेवावी, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी रात्री (१६ सप्टेंबर) आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदपाठक, उपवनसरंक्षक श्री. सेपट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रहाणे, नगर पालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाचे नियोजन व कोरोनाबधितांची जिल्ह्याची सद्यस्थिती याबाबत सविस्तर आढावा घेऊन श्री. केदार म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या रोडावलेली असली तरी धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे प्रशासनाने व आरोग्य यंत्रणांनी गाफील न राहता त्याअनुषंगाने सर्व आरोग्य सोयी-सुविधांची तजवीज करून ठेवावी. चाचण्यांचे प्रमाण वाढवून कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. अशा व्यक्तींमध्ये पुन्हा कोरोनाबाधित आढळल्यास कुठल्या व्यक्तीने कोणती लस घेतली होती याची व्यवस्थित माहिती ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जिल्हयातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करुन घ्यावे यासाठी कर्मचा-याची आवश्यकता भासल्यास सेवाग्राम व सावंगी मेघे येथील रुग्णालयाच्या कर्मचा-यांची सेवा घेण्यात यावी. सेवाग्राम रुग्णालयाला लिक्वीड ऑक्सीजन व शासकिय रुग्णालयाला ऑक्सीजन सिंलेडर पुरविणाऱ्या ऑक्सीजन कंपनीशी ऑक्सीजन पुरवठ्याबाबत करार करुन घेण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या.
चरखा सभागृह व परिसराच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तत्काळ एजन्सीची नियुक्ती करावी त्याचबरोबर सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत होणाऱ्या कामामधील धामनदीवर फांऊटेन व दक्षिणेकडील कामे तात्काळ करण्यात यावी. नगर पालिका क्षेत्रात 14 व्या वित्त आयोगातून करण्यात येणारी कामे नियोजनपूर्वक करावी अशाही सूचना यावेळी श्री केदार यांनी दिल्या. यावेळी इतर विषयाचा सुध्दा आढावा त्यांनी घेतला.

Exit mobile version